वृत्तसंस्था/हांगझोयु
आशिया चषक महिलांच्या हॉकी स्पर्धेला येथे शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. सलीमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाचा सलामीचा ब गटातील सामना थायलंडबरोबर होणार आहे. भारतीय संघ आपल्या मोहीमेला विजयी सलामीने प्रारंभ करण्यासाठी सज्ज झाला आहे. जागतिक महिला हॉकी मानांकनात भारत सध्या 9 व्या तर थायलंड 30 व्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारताला सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. ब गटात थायलंड, जपान, सिंगापूर यांचा समावेश आहे. जपानला मानांकनात बारावे तर सिंगापूरला 31 वे स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेत यजमान चीन, द.कोरिया, मलेशिया, चीत तैपेई यांचा समावेश आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय महिला संघाला मानांकनात चीनच्या मानांकनानंतरचे स्थान मिळाले आहे. जागतिक मानांकनात चीन चौथ्या स्थानावर आहे.
महिलांच्या आशिया चषय हॉकी स्पर्धेला आगामी विश्वचषक महिलांच्या हॉकी स्पर्धेच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कारण या स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा संघ पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्स यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत थेट पात्र ठरेल. या स्पर्धेत भारताच्या मोहिमेला शुक्रवारच्या थायलंडबरोबरच्या सामन्याने प्रारंभ होत आहे. भारताचा या स्पर्धेत दुसरा सामना शनिवारी जपानबरोबर होणार आहे. त्यानंतर भारताचा ब गटातील शेवटचा सामना सिंगापूरबरोबर 8 सप्टेंबरला खेळविला जाईल. भारतीय हॉकी संघासमोर दुखापतग्रस्त खेळाडूंची समस्या चांगलीच भेडसावत आहे. अनुभवी गोलरक्षक सविता पुनिया, दीपिका या अद्याप दुखापतीच्या अवस्थेतून पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाहीत. घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे सविताला या स्पर्धेत सहभागी होता आलेले नाही.









