कडोली मराठी साहित्य संघातर्फे महिला दिन साजरा
वार्ताहर /कडोली
शैक्षणिक, सामाजिक व इतर क्षेत्रात महिलांनी भरारी घेतलेली आहे. पण अद्याप काही ठिकाणी तिला लढा द्यावा लागत आहे. तिची मानसिक स्थिती आणि भीती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत महिला सक्षम झाल्या असं म्हणता येणार नाही, असे उद्गार ब्रह्माकुमारी ओम आश्रमच्या कार्यकर्त्या वंदना दीदी यांनी काढले. येथील कस्तुरबा महिला मंडळाच्यावतीने रविवारी कडोली मराठी साहित्य कार्यालयात आयोजित महिला दिन कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. त्या पुढे बोलताना, स्त्री अद्याप अत्याचारमुक्त झालेली नाही. ती जगण्यासाठी धडपड करीत असून तिचे विचारही बदलणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ आई आणि सासूचे आपल्या सुनेबद्दलचे विचार बदलत नाहीत तोपर्यंत नारी सुधारली असेही म्हणता येणार नाही. चूल आणि मूल दृष्टिकोन बदलला असून स्त्री हक्क मिळविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सोनाली कुट्रे यांनी, स्त्रीने जीवनात वावरत असताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्त्री आजारी पडली की संपूर्ण कुटुंब आजारी पडते. अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा स्त्रीने आपल्या आहाराकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. कुटुंबाबरोबर आपणही चांगला आहार घ्यावा, असे आवाहन केले. प्रारंभी सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.रोहिणी होनगेकर यांनी प्रार्थना सादर केली. कस्तुरबा महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिमा पाटील यांनी प्रास्तविक व स्वागत केले. यावेळी खजिनदार कल्पना अतिवाडकर, लिलावती तेरणीकर यांनी मनोगत व्यक्त केले. उज्ज्वला उच्चूकर, धनश्री होनगेकर, रोहीणी होनगेकर यांनी गीते सादर केली. कडोली मराठी साहित्य संघाचे माजी अध्यक्ष बसवंत शहापूरकर आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन धनश्री होनगेकर यांनी केले.









