केंद्राकडून महिलांवर लक्ष केंद्रीत : नवरात्रादरम्यान मोठ्या घोषणेची शक्यता : 5 राज्यांमध्ये लवकरच निवडणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिला आरक्षण कायदा लागू केल्यावर केंद्र सरकार 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनुसार महिलांच्या नावावर घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर पुरुषांच्या तुलनेत कमी केले जाणार आहेत. याच्याशी संबंधित योजना नवरात्रोत्सवादरम्यान घोषित होऊ शकते.
केंद्र सरकारने महिलांना स्वस्त कर्ज मिळवून देण्यासाठी विस्तृत अहवाल तयार केला आहे. कर्जावर किती सूट मिळणार या प्रश्नावर अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सध्या याचा खुलासा केला जाऊ शकत नसल्याचे सांगितले आहे. 30-40 लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज घेणाऱ्या महिलांना व्याजात सूट मिळण्याची शक्यत आहे. गृहकर्जाकरता महिला सह-अर्जदार असेल तरीही ही सूट मिळू शकते. बँकांसोबत एनबीएफसी संस्था देखील स्वस्त कर्जाची योजना अंमलात आणणार असल्याचे मानले जात आहे.
संपत्ती निर्मितीकरता प्रोत्साहन
महिलांना कर्जावरील व्याजात सूट देण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे सादर केली जाणार आहेत. सामान्य महिलांना ही सूट मिळणारच. परंतु सिंगल चाइल्ड मदर, ओनली गर्ल चाइल्ड मदर किंवा विधवा महिलेला याप्रकरणी अधिक सूट मिळू शकते. तर नोकरी करणाऱ्या महिलांना देखील स्वस्त दरात कर्ज देण्याचा विचार केला जात आहे. रोजगाराशी जोडले गेलेल्या युवतींना व्याजावरील सूटचा लाभ देत त्यांना संपत्ती निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचा यामागे उद्देश आहे. अनेक राज्यांमध्ये जमीन किंवा घरखरेदीच्या नोंदणीवर कमी शुल्कामळे महिलांच्या नावावर अधिक संपत्ती नोंद होत आहेत, अशाच प्रकारे महिलांच्या नावावर कर्ज वाढल्याने त्यांच्या अचल संपत्तीही वाढणार असल्याचे भाजपच्या रणनीतिकारांचे वाटत आहे.
महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक
गृहकर्ज घेण्याप्रकरणी महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा आहे. 46 टक्के पुरुषांच्या तुलनेत 48 टक्के महिलांना गृहकर्ज घेतले आहे. उर्वरित 6 टक्के गृहकर्ज संयुक्त स्वरुपात घेण्यात आले आहे. व्यवसाय, शेती आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी देखील महिलांमध्ये कर्ज घेण्याचा ट्रेंड वेगाने वाढला आहे. जे राजकीय पक्ष 33 टक्के महिला आरक्षण तत्काळ प्रभावाने लागू न करण्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही योजना पुरेशी असल्याचे सरकारला वाटत आहे.









