भाजपचा महिला उमेदवारीवर भर
पणजी : गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांत महिला मतदारांची संख्या पुऊष मतदारांपेक्षा जास्त असल्यामुळे ज्या उमेदवारास महिला मतदार मतदान करतील, तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त असल्याचे समोर आले आहे. भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांनी याची दखल घेऊन दक्षिण गोव्यासाठी महिला उमेदवार देण्याची सूचना गोवा प्रदेश भाजपला केल्याचे दिसून येते. दक्षिण गोवा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या 3,04,575 एवढी आहे तर पुऊष मतदार 2,86,398 आहेत. त्यातील फरक पाहिल्यास महिला मतदार 18359 एवढ्या संख्येने जास्त आहेत. त्या महिला उमेदवार ज्या उमेदवाराला मतदान करतील तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. महिला मतदारांची सर्वाधिक मते घेण्यात जो उमेदवार यशस्वी होईल तो उमेदवार जिंकून येणार अशी परिस्थिती असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. म्हणूनच कदाचित दक्षिण गोव्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी महिला उमेदवार मागितला असावा, असा अंदाज आहे. भाजप महिलांना देखील संधी देतो असेही दाखवून देऊन दक्षिण गोव्यात महिला उमेदवारास निवडून आणण्याचा डाव असू शकतो. उत्तर गोवा मतदारसंघातही तसेच चित्र असून महिला मतदारांची संख्या पुऊषांपेक्षा जास्त आहे. तेथे महिला मतदारांची संख्या 2,96,543 एवढी आहे तर पुऊषांची संख्या 2,79,230 इतकी आहे. तेथेही महिलांची मते खेचणाऱ्या उमेदवारास जिंकण्याची संधी जास्त आहे. परंतु भाजपने तेथे महिला उमेदवाराचा आग्रह न करता विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांना उमेदवारी बहाल केली आहे. दोन्ही मतदारसंघात मिळून एकूण 35,672 एवढी महिला मतदारांची संख्या अधिकची आहे. उत्तर गोव्यात एकूण 17,313 एवढ्या संख्येने महिला मतदार पुऊषांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे महिला मतदारांची सर्वाधिक मते मिळवण्यासाठी उमेदवार आता धडपडणार अशी चिन्हे दिसत आहेत. महिला मतदारांनी ठरवले तर एखादा उमेदवार विजयी होऊ शकतो किंवा पराभूत होण्याची पाळी त्याच्यावर येऊ शकते, असे एकंदरित चित्र आहे.









