अगरबत्ती उद्योगाच्या नावाखाली फसवणूक : पैसे वसूल करण्याची मागणी
बेळगाव : घरबसल्या काम देण्याचे सांगून सोलापूर येथील एका तरुणाने बेळगाव परिसरातील हजारो महिलांची फसवणूक केली. सदर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खासबाग, सुळेभावी, निलजी, बसरीकट्टी येथील महिलांनी सदर तरुणांविरोधात मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस आयुक्त कार्यालयाला धडक मारली. अगरबत्ती उद्योगाच्या नावाखाली सदर फसवणूक करणाऱ्या तरुणाला त्वरित अटक करून आमच्या मेहनतीचे पैसे परत करण्याची मागणी महिलांनी केली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांना देण्यात आले. रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले.
सदर तरुणाने शिवाजीनगर येथे बी. एम. ग्रुप महिला गृहउद्योग नावाने एक कार्यालय सुरू केले होते. शहर व उपनगर तसेच ग्रामीण भागातील महिलांशी संपर्क साधून घरात बसून अगरबत्ती तयार करून पगार मिळवा, असे सांगत महिलांच विश्वास संपादन केला होता. तसेच काही रिक्षाचालक व टॅम्पो चालकांशी संपर्क साधून महिलांनी तयार केलेली उत्पादने घेऊन येण्यासाठी बोलणी करून ठेवली होती. प्रारंभी सदर युवकांनी महिलांकडून काही रक्कमही वसूल करून घेऊन महिन्याला तुम्हाला पगार देण्याचे आश्वासन दिले होते.
सुरुवातीचे दोन-तीन महिने महिला व चालकांना 2500 ते 3000 पर्यंत रक्कमही दिली होती. यानंतर उत्पादने तयार केल्यानंतर त्याची उचल करण्यात आली. मात्र पगारी रक्कम महिलांना देण्यात आलेली नाही. काही महिलांनी दूरध्वनीद्वारे सदर युवकाशी संपर्क साधून आपला पगार देण्याची विनवणी केली. मात्र त्याच्याकडून सतत उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. सदर प्रकार चालकांसोबतही घडला असून त्यांनी संपर्क साधला असता त्यांना धमकी देण्याचे कृत्य सदर युवकांकडून झाले आहे.
काही दिवसांनंतर फसवणूक करणाऱ्या युवकाने सोलापूर गाठून तेथेच वास्तव केले. यानंतर त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने विविध ठिकाणी असल्याचे सांगत धमकीही दिली. यामुळे महिलांवर आर्थिक संकट ओढावले असून त्यांचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी सदर युवकाला तात्काळ अटक करून आमचे पैसे वसूल करण्याची मागणी महिलांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी अवधूत तुडवेकर, एस. पी. सुळेभावी, आर. एम. चव्हाण, रेखा कुडेकर, जे. आर. मन्नोळकर, एल. एस. कुलकर्णी यांच्यासह खासबाग, निलजी, सुळेभावी, बसरीकट्टी येथील महिलांसह रिक्षा व टेंपोचालक उपस्थित होते.









