राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोल्हापूर : मासिक भिशी सुरु करुन त्याद्वारे आकर्षक व्याज देण्याच्या आमिषाने राजेंद्रनगर परिसरातील ४० महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. पती व पत्नीने महिलांकडून २५ लाख रुपयांची रक्कम गोळा करुन पलायन केले. या प्रकरणी भिकाजी पंडित शिंदे, प्राजक्ता भिकाजी शिंदे (रा. म्हाडा कॉलनी, राजेंद्रनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद राजन आप्पासो थोरवत (रा. राजेंद्रनगर) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, भिकाजी शिंदे राजेंद्रनगर येथील म्हाडा कॉलनीचे चेअरमन होते. यामुळे त्याची परिसरातील नागरिकांसोबत चांगली ओळख होती. याचा फायदा घेऊन शिंदे दाम्पत्याने २०२० मध्ये मासिक भिशी सुरु केली. यामध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिषही महिलांना दाखविले.
यानुसार महिलांनी एक हजार रुपयांपासून २० हजार रुपयांपर्यंतची भिशी शिंदे याच्याकडे सुरु केली. पहिली दोन वर्षे ही भिशी सुरळीत सुरु राहिली. २०२२ ते २०२४ या कालावधीत शिंदे दाम्पत्याने भिशी गोळा करुन त्याचे वितरण केले नाही. राजेंद्रनगर परिसरातील नागरिकांनी याबाबत वारंवार भिकाजी शिंदे व त्याच्या पत्नीकडे विचारणा केली.
वारंवार पाठपुरावा करुनही शिंदे याने पैसे परत न केल्यामुळे राजन थोरवत ४० महिलांचे जबाब आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर राजेंद्रनगर परिसरातील ४० महिलांचे जबाब घेण्यात आले आहेत. या महिला शिंदे याच्याकडे दर महिन्याला भिशी भरत होत्या.
एक हजार पासून २२ हजारांपर्यंत गुंतवणूक
शिंदे दाम्पत्याकडे राजेंद्रनगर मधील अनेक महिला गुंतवणूक करत होत्या. १ हजार पासून २२ हजार रुपयांपर्यंतची ही गुंतवणूक होती. दरमहा गुंतवणूक केल्यावर वार्षिक १० टक्के तर एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर वार्षिक १२ ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
व परिसरातील महिलांनी ऑगस्ट २०२५ मध्ये याबाबत आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे अर्ज केला. पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की–कवळेकर यांनी याबाबतचा तपास करुन गुन्हा दाखल करण्याच्या सूचना राजारामपुरी पोलिसांना दिल्या. यानुसार शनिवारी गुन्हा दाखल झाला.








