शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्याच्या घटनेत वाढ : स्त्रीशक्तीने जागरुक होऊन खबरदारी घेणे आवश्यक
बेळगाव
- चंदन होसूर येथे महिलेच्या गळ्यातील दागिना खेचल्याची घटना
- उडकेरी येथे चाकूने हल्ला करून दागिना खेचला- महिलेचा हात रक्तबंबाळ
- अशोकनगर येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याची घटना
- सदाशिवनगर येथे बुधवारी सकाळी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले
या सर्व आठवडाभरातील घटना आहे. नाहक महिला अशा घटनांना बळी ठरत आहेत. शहरात नुकताच सर्व ठिकाणी महिला दिन साजरा झाला. या निमित्ताने महिला किती कणखर आहेत, त्यांची किती क्षमता आहे, त्या अडचणींना कशा सामोऱ्या जातात? याचे गोडवे गायिले गेले. मात्र, दुर्दैवाने प्रत्यक्षात कोणत्या पातळीवर आपण कणखर व्हायला हवे आणि आपले दिसणे महत्त्वाचे की असणे महत्त्वाचे? याचा विचार महिला करणार नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने सक्षमीकरण झाले, असे म्हणता येणार नाही. याचे कारण असे, की शहरात पुन्हा एकदा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा गळ्यातील हार खेचणे, दागिने पळविणे, त्यांना सहजगत्या फसवून त्यांच्याकडील वस्तू हातोहात लांबविणे हे प्रकार वाढत चालले आहेत. हे मान्यच आहे, की कोठेही वावरताना महिला सुरक्षित असाव्यात. ही जबाबदारी प्रशासनाची किंबहुना अधिक प्रमाणात पोलीस प्रशासनाची आहे. मात्र, दुर्दैवाने त्यांच्यासमोर असणाऱ्या अनेक अडचणी आणि अपुरे मनुष्यबळ महिलांना सुरक्षितता देण्यास असमर्थ ठरते आहे. आपल्या सरकारकडून किंवा प्रशासनाकडून अनेक अपेक्षा असतात. त्या अपेक्षा करणे गैर नाही. परंतु, जेव्हा त्यांची पूर्तता होत नाही, तेव्हा आपण आपली शहाणीव वाढवायला हवी.
अलीकडे आरोग्याबाबत जागरुकता वाढल्याने सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. महिलांमध्ये तर फिटनेसची जाणीव अधिकच तीव्र झाली आहे. परंतु, फिरावयास जाताना दागिने घालून जाणे आवश्यक नाही. भावनिक मुद्दा करून मंगळसूत्र काढणे पटत नसेल तर साधे मंगळसूत्र किंवा काळ्या मण्यांची पोत घालता येते. भावनिकता की वास्तवता? याचा विचार करायला हवा. मोठ्या हौसेने घातलेले मंगळसूत्र चोरांच्या हाती जाण्यापेक्षा ते घरी ठेवून फिरायला गेलेले केव्हाही चांगले. लग्नकार्यालयामध्ये दागिन्यांनी मढलेल्या महिला सर्वत्र वावरत असतात. किती दागिने घालावेत? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु, अशा महिलांच्या गळ्यातील किंवा पर्समधील दागिने चोरीला गेल्याच्या घटना बेळगावमध्ये नवीन नाहीत. दागिन्यांचे प्रदर्शन सतत करणेही आवश्यक नाही. हौसेला मोल नाही, हे जरी खरे असले तरी त्या हौसेची किंमत अशा पद्धतीने मोजावी लागते, हे काही संयुक्तिक नाही. कारण उडकेरी येथे महिलेने विरोध करताच तिच्या हातावर चाकू मारण्यात आला आहे. यामध्ये तिच्या गळ्याला जखम झाली असून हाताला जबर दुखापत झाली आहे.
देवळात जाणाऱ्या, सेल किंवा महिलांसाठीच्याच खास कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणाऱ्या महिलांवर चोर, लुटारुंची नजर असते, लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे चोरट्या महिलांची संख्याही वाढली आहे. सराफी दुकानात झालेल्या चोऱ्यांमध्ये या महिलांचा सहभाग अधिक होता. त्यामुळे आपण किती सजग रहायला हवे, याचे भान जर आपल्याला येणार नसेल तर महिला दिन साजरा करणे हा निव्वळ एक फार्स ठरेल. सर्वच महिला काही स्वसंरक्षणाचे धडे घेत नाहीत. सातत्याने पोलीस प्रशासनही दागिने घालून फिरू नका, असे सांगत आहे. यामध्ये आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा येते, असे म्हणणे हास्यास्पद आहे. आपण सुरक्षित राहिलो तर व्यक्तिस्वातंत्र्य आणि अन्य चर्चांना अर्थ आहे. एक तर फिरायला जाताना समूहाने जा, अशी सूचना करण्यात येते. परंतु, चार महिला जमल्या की आमच्या गप्पा होतात आणि चालणे मंदावते, असे कारण पुढे करण्यात काही अर्थ नाही. आपले ध्येय जर आरोग्यासाठी चालायचे आहे तर त्यावरच लक्ष पेंद्रित करायला हवे. अन्यथा गर्दीच्या ठिकाणी किंवा आपल्या टेरेसवर, ओळखीच्या परिसरात चालायला जाणे अधिक श्रेयस्कर ठरेल. मंगळसूत्र खेचणारे दुचाकीस्वार हातात हत्यार घेऊन फिरत आहेत. अशा चोरांना आवरा आणि सुरक्षितता द्या, अशा मागणीसाठी शहरातील महिला कधीच एकत्र येत नाहीत. किंबहुना सामाजिक प्रश्नांवर त्या बोलतही नाहीत. त्यामुळे नेहमीच ‘तू छान, मी छान’, ‘तू मला, मी तुला’ असे आपण करत राहिलो तर सक्षमीकरणापासून आपण फार दूर आहोत, असेच खेदाने म्हणावे लागेल.
दागिने घालणे, आपल्याला हवा तसा महिला दिन साजरा करणे, हा ज्या त्या महिलांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु, समाजात वावरताना एक नागरिक म्हणून आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत. जेव्हा आपण स्त्राrस्वातंत्र्याच्या, समानतेच्या, समाजप्रबोधनाच्या अपेक्षा करतो, तसेच समाजाच्याही काही अपेक्षा असतात. मूलभूत समस्यांवरती महिलांनी आवाज उठवावा, अशी अपेक्षा समाजाची आहे. दागिन्यांचे एवढे स्तोम माजवण्याचे कारण नाही. माझे दागिने माझा हक्क, असे जर कोणी म्हणत असेल तर कोणी ते दागिने खेचले म्हणून नक्राश्रू ढाळण्यातही अर्थ नाही. पोलिसांकडून अपेक्षा निश्चितच आहे. पण त्यांची पूर्तता व्हावी, महिलांसाठी सुरक्षित वातावरण हवे यासाठी अपवाद वगळता महिला कधीच पुढे येत नाहीत. त्यामुळे प्रशासनावर, पोलीस दलावर जो एक सामाजिक दबाव असायला हवा, तो रहात नाही. घटना घडल्यानंतर चौकशी सुरू होते. संबंधित महिलेला उपदेशाचे डोस दिले जातात. पोलिसांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. कुटुंबातील लोकांची नाराजी किंवा राग पत्करावा लागतो. या सर्व प्रकरणात मनस्ताप होतो तो वेगळाच. अशावेळी तरी आपण एकत्र येणार की नाही? एवढाच प्रश्न आहे. आपला आत्मविश्वास, आपली इतरांना मदत करण्याची वृत्ती आणि आपल्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य या इतका सुंदर दागिना नाही, हे आम्हाला कळेल, तो दिन सुदिन होय.
जिचे तिने ठरवावे…
आपल्या दिसण्याबद्दल अत्यंत सजग असणाऱ्या महिला व तरुणींना दुचाकीवर बसताना ओढणी सांभाळण्याचे भान रहात नाही. कित्येकदा मागच्या चाकामध्ये ओढणी अडकण्याची शक्यता दिसते. तेव्हा धावपळ करून त्यांना सावध करण्याचा अनुभव सतत आलेला आहे. त्याचप्रमाणे दागिने सांभाळण्याबाबतही अनेकदा जागृती केली गेली आहे. समस्त स्त्राrशक्तीने यासंदर्भात परिपत्रके वाटून महिलांना जागृत केले होते. आता या सर्वांचा विचार करून शहाणे व्हायचे की नाही? हे जिचे तिने ठरवावे.









