उंब्रज :
मार्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना पल्सर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांच्याकडील सोन्याचा ऐवज लुटल्याची घटना गुरुवारी 10 रोजी सकाळी घडली. अंधारवाडी येथे मैत्रिणीसोबत चालण्यासाठी गेलेल्या उंब्रज येथील 45 वर्षीय महिलेस चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. तर शिवडे हद्दीत सासू-सुनेला चोरट्यांनी मारहाण करुन चाकूच्या धाकाने लुटल्याची घटना घडली आहे.
उंब्रज पोलीस ठाण्यात दोन्ही घटनांची नोंद झाली आहे. चोरट्यांनी साडेसात तोळ्याचे दागिने लंपास केले. या घटनेने उंब्रज परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पल्सर दुचाकीवरील तिघा अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.
अंधारवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत गावच्या कमानी जवळच्या वळणावर उंब्रज ते अंधारवाडी रोडला मनिषा शहाजी कदम मार्निंग वॉक करत होत्या. यावेळी तीन अज्ञातांनी काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून येऊन मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून गळयातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले. तसेच अपूर्वा आकाश अर्जुगडे व त्यांच्या सासूबाई सुनीता विजय अर्जुगडे या शिवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत उंब्रज ते शिवडे सर्व्हिस रोडने मार्निंग वॉक करीत होत्या. सकाळी सातच्या सुमारास त्यांना मारहाण केली. अन् चाकू दाखवून त्यांच्या गळ्यातील 5.5 तोळ्याचे सोन्याचे गंठण जबरदस्ती हिसकावून नेले.
याबाबत मनिषा शहाजी कदम (रा. उंब्रज) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनिषा कदम या गुरुवारी 10 जुलै रोजी नेहमीप्रमाणे सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास उंब्रज ते अंधारवाडी रोडने मॉर्निंग वॉक करीत होत्या. त्यांच्यासोबत त्यांची रोहिणी मारूती साळुंखे या होत्या. सकाळी 6.55 वाजण्याच्या सुमारास अंधारवाडी गावच्या कमानीच्या अलिकडे वळणावर चालत होत्या. यावेळी समोरुन एक काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल आली. त्यावरून तीन अनोळखी चोरटे तोंडाला मास्क बांधून आले होते. त्यांनी मनिषा कदम यांच्या जवळ येवून मोटारसायकल थांबवली. त्यातील एकाने मनिषा यांना खाली पाडून मारहाण करत चाकूचा दाखवला. दुसऱ्याने गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून घेतले. अचानक घडलेल्या या प्रकाराने मनिषा कदम यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यावेळी एकाने त्यांना चाकू मारला तो डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला आहे. चोरट्यांनी गंठण हिसकावून तिघे उंब्रजकडे पल्सरवरून पळून गेले.
दरम्यान पल्सरवरुन आलेल्या याच तिघांनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवडे गावच्या हद्दीत अपुर्वा आकाश अर्जुगडे व त्यांच्या सासूबाई सुनीता विजय अर्जुगडे या उंब्रज ते शिवडे सर्व्हिस रोडने मॉर्निंग वॉक करीत होत्या. त्यांनाही मारहाण करून चाकुचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले आहे. पोलीस ठाण्यात साडेसात तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची नोंद आहे. चालू बाजारभावानुसार चोरट्यांनी साडेसात लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे. तिघांनीही चेहऱ्याला मास्क बांधला होता.
- मार्निंग वॉकला जाणाऱ्यांची धास्ती वाढली…
उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंगच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. परंतु गुरुवारी चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून महिलांना मारहाण करत जबरी चोरी केल्याने दहशत निर्माण झाली आहे. उंब्रज- अंधारवाडी रोड व शिवडे हद्दीतील सेवा रस्त्यावर सकाळच्या वेळी, वयोवृद्ध, महिला युवक मार्निंग वॉक व व्यायामासाठी येतात. पल्सर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन त्यांना लुटल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
..








