व्हाइस अॅडमिरल आरती सरीन यांची नियुक्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्हाइस अॅडमिरल आरती सरीन यांना मंगळवारी सशस्त्र दल चिकित्सा सेवांचे पुढील महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्या सशस्त्र दल चिकित्सा सेवांचे प्रमुख म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. भारतीय सशस्त्रदलांमध्ये सेवा बजावणाऱ्या सर्वात मोठ्या रँकच्या त्या महिला अधिकारी देखील आहेत. डीजीसीएएफएमएस संरक्षण मंत्रालयाला सशस्त्र दलांशी संबंधित वैद्यकीय धोरणांप्रकरणी थेट उत्तरदायी आहे.
व्हाइस अॅडमिरल सरीन यांना 1985 मध्ये कमिशन करण्यात आले होते. पुण्यातील सशस्त्र दल चिकित्सा कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळविली आहे. त्यांच्याकडे रेडिओ डायग्नोसिस आणि रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये दोन पदव्युत्तर पदव्या आहेत. तसेच त्या गामा नाइफ सर्जरीत प्रशिक्षित आहेत.
स्वत:च्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर कार्य केले आहे. भारतीय नौदल आणि वायुदलासाठी चिकित्सा सेवांचे महासंचालक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. आयएनएचएस अश्विनी आणि एएफएमसीचे नेतृत्व त्यांनी केले आहे. तसा त्या नौदलाची दक्षिण कमांड आणि पश्चिम कमांडच्या त्या कमांड मेडिकल ऑफिसर देखील राहिल्या आहेत.
राष्ट्रीय कृतिदलाच्या सदस्य
अलिकडेच त्यांना डॉक्टरांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रोटोकॉल तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून स्थापन राष्ट्रीय कृतिदलाच्या सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जुलै महिन्यात सरीन यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून उत्कृष्ट सेवेसाटी अतिविशिष्ट सेवापदकाने गौरविण्यात आले होते.









