प्रतिनिधी /पणजी
जनसेवेसाठी असलेल्या 108 रुग्णवाहिकेमध्ये एक महिला इस्पितळात पोहोचण्यापूर्वी वाटेतच प्रसूत झाली. यावेळी रुग्णवाहिकेतच पूर्णसेवा देणाऱ्या डॉ. नविता व त्यांच्या सहकाऱ्यांचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी अभिनंदन केले आहे.
सदर महिलेला प्रसूती वेदना होताच 108 रुग्णवाहिकेला बोलाविण्यात आले, मात्र प्रसूती वेदना एवढ्या वाढल्या की, रुग्णवाहिकेत असतानाच सदर महिला प्रसूत झाली. डॉ. नविता व त्यांच्या मदतनीसांनी सदर महिलेची रुग्णवाहिकेतच सुटका केली. त्यानंतर रुग्णवाहिका कुडचडे-काकोडे येथील इस्पितळात आणली व बाळ व महिलेला इस्पितळात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृत्ती उत्तम आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी डॉ. नविता तसेच रुग्णवाहिका चालविणारे समीर खेडेकर तसेच मदतनीस पुंडलिक सुतार यांचे अभिनंदन केले आहे व 108 ही सरकारची उत्तम सेवा देणारी संस्था ठरविलीत, असे ट्विट करून आरोग्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.









