बेळगाव : रोहयोंतर्गत वर्षाला 100 दिवस काम देण्याचा कायदा आहे. मात्र गेल्या वर्षभरात केवळ 60-70 दिवसच काम देण्यात येत आहे. यंदा एप्रिलपासून केवळ 21 दिवसच काम देण्यात आले असून भत्ताही देण्यात आलेला नाही. यामुळे आमच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली असून आर्थिकदृष्ट्या समस्याही निर्माण झाली आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समस्यांची दखल घेऊन त्यांचे निवारण करण्याची मागणी मोदगा येथील महिलांनी केली. याबाबतचे निवेदन ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना देण्यात आले. रोहयोंतर्गत दिवसाच्या वेतनासह पुरुषांना 4 रु. तर महिलांना 5 रु. याप्रमाणे अधिक पैसे मिळतात.
पण अद्याप आम्हाला ग्रा. पं. कडून कोणत्याही प्रकारची पावती देण्यात आलेली नाही. रोहयोंतर्गत अनेक कामे केली जातात. याद्वारे 100 दिवसांचे काम देण्याचा नियम आहे. मात्र गेल्यावर्षी 60 ते 70 दिवसांचेच काम देण्यात आले. रोहयोमध्ये काम करणाऱ्यांना कामगार बंधू असे म्हटले जाते. पण अद्याप आम्हाला संबंधित ओळखपत्र देण्यात आलेले नाही. यंदा 1 एप्रिलपासून रोहयो कामाची सुरुवात होते. कामासाठी 15 मार्च रोजीच निवेदन देण्यात आले होते. 19 मेपर्यंत केवळ 21 दिवसांचेच काम देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक महिलांवर बेरोजगार होण्याची वेळ आली असून त्यांच्या समस्यांची दखल घेऊन रोजगार भत्ता देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.









