दर्श अमावस्यानिमित्त भाविकांची उपस्थिती : प्रत्येक बस फुल्ल, महिला प्रवाशांत लक्षणीय वाढ
वार्ताहर /बाळेकुंद्री
राज्यात महिलांना मोफत बससेवा उपलब्ध करून दिल्याने बेळगाव जिल्ह्यातील लाखो भाविकांनी सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थानला जाऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच सोगल येथील सोमनाथ मंदिराला व बदामी येथील बनशंकरी देवीच्या दर्शनाला महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. दर्श अमावस्यानिमित्त सर्व मंदिरे भाविकांनी फूलून गेली होती. सरकाराने शक्ती योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शुक्रवारी व मंगळवारी येथील स्थळांना भेट देऊन दर्शन घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येने प्रवास करू लागल्या आहेत. बसेस खचाखच भरत असल्याने पुरूषांना व मुलांना बराचवेळ गावच्या व तालुक्याच्या बसस्थानकावर ताटकळत थांबावे लागत आहे. रविवारी तर दर्श अमावस्यानिमित्त सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती. सकाळपासून प्रत्येक बस डोंगरावर भरून येत होती. परिणामी यल्लमा डोंगर महिलांनी खचाखच भरला होता. कित्तूर कर्नाटक व कल्याण कर्नाटकातील विविध जिल्ह्यातील लाखो महिला भाविक परिवहनच्या बसमधून डोंगरावर येत यल्लमा देवीचे रविवारी दर्शन घेतले. सरकारने शक्ती योजनेअंतर्गत मोफत बस प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी येऊन देवीचे दर्शन घेतल्याचे गदग येथील सिद्यम्मा होळेतीन, लिंगसूर येथील मल्लम्मा बिरादार तसेच इलकलच्या गंगव्वा शिरगुप्पी या महिलांनी सांगितले.









