शहरातीलच नव्हे तर बेळगाव-खानापुरातूनही धाव : सकाळी 7 वाजल्यापासून धडपड
बेळगाव : राज्य सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी बँक अथवा पोस्ट विभागामध्ये बँक खाते असणे सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे मागील महिनाभरापासून पोस्ट कार्यालयांमध्ये खाते उघडण्यासाठी महिलांची तुफान गर्दी होत आहे. सोमवार दि. 6 रोजी तर कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात दोन हजारांहून अधिक महिला बँक खाते उघडण्यासाठी रांगेमध्ये उभ्या होत्या. सकाळी 7 वाजल्यापासून खाते उघडण्यासाठी महिलांची धडपड सुरू होती. राज्य सरकारने सुरू केलेल्या गृहलक्ष्मी योजनेसोबतच रेशनकार्डवरील अतिरिक्त तांदळाची रक्कम मिळविण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याबरोबरच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्यांसाठी पोस्ट विभागामध्ये खाते उघडले जात आहे. पोस्टामध्ये उघडलेल्या खात्यामध्ये सर्वप्रकारच्या योजना, शिष्यवृत्त्या, अनुदान यांची रक्कम जमा होत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.
खाते उघडण्यासाठी चार काऊंटर
पोस्टात बचत खाते उघडण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. केवळ बेळगाव शहरातीलच नाही तर खानापूर तालुक्यातूनही महिला मुख्य पोस्ट कार्यालयात येऊन खाते काढण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे पोस्ट विभागाने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी चार काऊंटर सुरू केले आहेत. दिवसभरात दीडशे ते दोनशे बँक खाती उघडली जात आहेत. त्याचबरोबर त्यांना पासबुक दिले जात आहे.
जवळच्या पोस्ट कार्यालयात खाते उघडण्याची सुविधा
पोस्टामध्ये बचत खाते उघडण्यासाठी मुख्य पोस्ट कार्यालयात येण्याची गरज नाही. घराजवळील कोणत्याही पोस्ट कार्यालयात जाऊन खाते उघडले जाऊ शकते. परंतु, महिलांना माहिती नसल्याने बेळगाव व खानापूर तालुक्यातील महिला शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात येत आहेत. महिलांनी शहरात येऊन गर्दी करण्यापेक्षा जवळच्या पोस्ट कार्यालयात बँक खाते उघडावे, असे आवाहन बेळगाव पोस्ट विभागातर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांनी एकाच वेळी गर्दी करू नये
योजनांचा लाभ मिळविण्यासाठी पोस्टामध्ये खाते उघडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील प्रत्येक पोस्ट कार्यालयात खाते उघडण्याची व्यवस्था केली आहे. याबरोबरच मुख्य पोस्ट कार्यालयात चार काऊंटर व पैसे काढण्यासाठी स्वतंत्र काऊंटर सुरू केले आहेत. नागरिकांनी एकाच वेळी गर्दी न करता जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन खाते उघडावे.
तिप्पेस्वामी (बेळगाव पोस्टमास्तर)









