अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात गर्दी
बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेचा लाभ एपीएल, बीपीएल व अंत्योदय या रेशनकार्डधारकांना देण्यात येत आहे. यासाठी रेशनकार्ड ई-केवायसी करणे आवश्यक आहे. बहुतांश एपीएल रेशनकार्डधारकांनी ई-केवायसी केली नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे रेशनकार्ड अपडेट करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या कार्यालयात नागरिकांची झुंबड उडाली. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत घरातील प्रमुख महिलेला दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. सदर योजना एपीएल, बीपीएल, अंत्योदय कार्डधारकांना लागू करण्यात आली आहे. मध्यंतरी रेशनकार्डे ई-केवायसी करून घेण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. रेशनकार्डवर नावे असणाऱ्या प्रत्येक सदस्यांचे आधारकार्ड रेशनकार्डशी लिंक करण्यात आले होते.
सरकारच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून मोफत तांदळाचा लाभ केवळ बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना देण्यात येत होता. त्यामुळे एपीएल कार्डधारकांनी सरकारच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले होते. ई-केवायसी करून घेण्यात आली नव्हती. त्यामुळे ई-केवायसी करून घेतलेल्या रेशनकार्डधारकांना नवीन नेंदणी क्रमांक देऊन रेशनकार्डवरील प्रत्येक सदस्याचे आधारकार्ड लिंक करण्यात आले होते. सध्या एपीएल कार्डधारकांनाही गृहलक्ष्मी योजनेचा लाभ दिला जात असल्याने ई-केवायसी करून घेणे गरजेचे बनले आहे. रेशनकार्ड अपडेट करून घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली आहे.









