वार्षिक तपासणी दिवस कार्यक्रमात संचालक रायकर यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
अग्निशामक दलात महिलांना सामावून घेण्याचा प्रलंबित प्रश्न निकाली निघाला असून दलाच्या इतिहासात प्रथमच एक महिला उपअधिकारी आणि तीन महिला फायर फायटर्स मिळून चौघांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचारी सध्या प्राथमिक अभ्यासक्रम प्रशिक्षण घेत आहेत, अशी माहिती अग्निशामक सेवा संचालक नितीन रायकर यांनी दिली.
अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या वार्षिक तपासणी दिवस परेड कार्यक्रमात ते बोलत होते. दलातर्फे आयोजित यंदाचा 35 वा वार्षिक तपासणी दिवस परेड होता. सांतईनेज येथे शनिवारी दलाच्या मुख्यालयाजवळील प्रशिक्षण मैदानावर आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, गृह खात्याच्या विशेष सचिव स्नेहा गित्ते, डीएफईएसचे संस्थापक संचालक पी. के. जॉन आदी मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते कवायत स्पर्धा व वार्षिक क्रीडा मेळाव्यातील विजेत्यांना चषक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
पुढे बोलताना श्री. रायकर यांनी, सदर वार्षिक तपासणी परेड हा खात्यासाठी एक महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले. कोणत्याही आपत्कालीन स्थितीत तत्पर प्रतिसाद देण्यासाठी अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या एकूण कार्यकुशलतेची तंदुऊस्ती पातळी तपासण्याच्या उद्देशाने असे उपक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे सर्व कर्मचारी तंदुऊस्त राहतील आणि हुशारीने टर्न आउट करू शकतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्री. रायकर यांनी प्रारंभी वार्षिक संचलनाची पाहणी केली आणि विविध श्रेणीतील अग्निशामक कर्मचाऱ्यांमधून सर्वोत्कृष्ट टर्न आउट पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. त्यात स्क्वॉड ड्रिल, लॅडर ड्रिल आणि पंप ड्रिलसाठी अग्निशामक दलाच्या मुख्यालयाला प्रथम स्थान प्राप्त झाले. ’टग ऑफ वॉर’ चे प्रथम स्थान फोंडा अग्निशामक केंद्राला प्राप्त झाले.
सर्वोत्कृष्ट टर्न आऊटचा पुरस्कार स्टेशन फायर ऑफिसर संतोष गवस, उप अधिकारी राजेश तलवार, लिडिंग फायर फायटर संतोष गावकर, वॉचरूम ऑपरेटर सीताराम कामत, ड्रायव्हर ऑपरेटर अशोक नाईक आणि दामोदर नाईक, तसेच फायर फायटर सिद्धेश वारंग, जयराम मुळगावकर, योगेश्वर पाटील आणि जितेंद्र नाईक यांना पुरस्कार देण्यात आले.









