जिल्ह्यात 250 पेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षण : महिला सबलीकरणाला प्राधान्य
बेळगाव : कचऱ्याची गंभीर समस्या लक्षात घेत शहरासह ग्रामीण भागातही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी प्रत्येक ग्राम पंचायतीला कचरावाहू वाहन देण्यात आले आहे. या वाहनांवर महिला चालकांची नेमणूक करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये 250 पेक्षा अधिक महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यातील 490 पेक्षा अधिक ग्राम पंचायतींना कचरावाहू वाहने वितरण करण्यात आली आहेत. वाहने वितरण करून सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. यामुळे चालकांची नेमणूक कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. महिला सबलीकरणाला प्राधान्य देऊन महिला स्वसाहाय्य संघाच्या माध्यमातून महिला चालकांची नेमणूक करण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतून महिला चालकांची नेमणूक होणार आहे. यासाठी रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 35 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र याठिकाणी होणारा विलंब व महिला चालकांची होणारी अडचण लक्षात घेत ग्राम पंचायत पातळीवरच त्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशिक्षकांची नेमणूक करून प्रशिक्षण देण्यात येत आहे. लवकरच त्यांना वाहन चालविण्याचा परवानाही देण्यात येणार आहे. कचऱ्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावण्यासाठी महिला स्वसाहाय्य संघांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीला देण्यात आलेल्या कचरावाहू वाहनांवर महिला चालक दिसणार आहेत.
लवकरच महिला चालक रुजू होणार…
ग्राम पंचायतींना कचरावाहू वाहने वितरित करण्यात आली आहेत. सदर वाहनांवर महिला वाहनचालकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. लवकरच चालक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
-हर्षल भोयर, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी









