गेल्या 25 वर्षांच्या काळात मद्यपानाचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे. केवळ पुरुषच नव्हे, तर महिलाही आता यात मागे नाहीत. निदान शहर भागांमध्ये तरी अशी स्थिती आहे. आजही नैतिकदृष्ट्या आणि शारिरीकदृष्ट्या मद्यपान अयोग्य मानले जाते. शक्यतो त्याच्यापासून दूर रहावे, असाच सल्ला दिला जातो.
महिलांच्या मद्यपानामध्ये भारतात कोणते राज्य आघाडीवर आहे, या संदर्भातील एक सर्वेक्षण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. हे सर्वेक्षण केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. अशा राज्यांमध्ये कदाचित महाराष्ट्र, पंजाब किंवा कर्नाटक-तामिळनाडूसारख्या तुलतेने प्रगत राज्यांचा समावेश होत असेल, अशी आपली समजूत असण्याची शक्यता आहे. पण या सर्वेक्षणाने य समजुतीला धक्का दिला आहे. महिलांच्या मद्यपानात भारतात आसाम राज्याने आघाडी घेतल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून निघाला आहे. या राज्यात 15 ते 49 या वयोगटातील 26.3 टक्के महिलांना मद्यपान करणे आवडते. आसामच्या खालोखाल मेघालयचा क्रमांक लागतो. याच वयोगटात या राज्यात हे प्रमाण 8.7 टक्के आहे. तर तिसरा क्रमांक अरुणाचल प्रदेशचा असून तेथे या वयोगटातील मद्यपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण 3.3 टक्के आहे. त्यानंतर सिक्कीम, छत्तीसगड, झारखंड , त्रिपुरा असे क्रमांक लागतात. झारखंड, छत्तीसगड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये महिलांच्या मद्यपानाचे प्रमाणे दिवसेंदिवस कमी होत आहे, असाही सकारात्मक निष्कर्ष या सर्वेक्षणातून निघाला आहे. 10 वर्षांपूर्वी झारखंडमध्ये 9.9 टक्के महिला मद्यपान करीत होत्या. मात्र, आता हे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी झालेले दिसून येते. एकंदर, ईशान्य भारत महिलांच्या मद्यपानात आघाडीवर दिसतो.









