सहा महिला मजुरांचा जागीच मृत्यू, एक महिला गंभीर जखमी
सोलापूर: प्रतिनिधी
पंढरपूर- कराड रोडवर असलेल्या चिकमहुद येथे शेतातील मजुरीचे काम आटोपून घरी निघालेल्या सात महिलांना ट्रकने धडक दिली. यात सहा महिलांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.
शेतातील मजुरीचे काम संपवून पुन्हा सांगोला तालुक्यातील कटफळ या आपल्या गावी या महिला मजूर निघाल्या होत्या. बसची वाट पाहत थांबलेल्या या महिलांना पंढरपूरहून चिकमहुद कडे निघालेल्या भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात सहा महिलांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान अपघाताची माहिती समजताच सांगोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर ग्रामस्थांच्या प्रचंड गर्दीमुळे हा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. मृत महिला या कटफळ तालुका सांगोला येथील एकाच गावातील असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.








