चारही स्थायी समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड
बेळगाव : महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची नियुक्ती शुक्रवारी पार पडली. यामध्ये महिलांनी बाजी मारली असून तीन समित्यांवर महिलांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेमध्ये महिलांचेच वर्चस्व सिद्ध झाले आहे. महापौर, उपमहापौरांसह तीन स्थायी समित्यांवर महिलाराज आले आहे. शुक्रवारी सर्व स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. यामध्ये सत्ताधारी भाजप पक्षाने आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. अर्थ, कर आणि अपिल स्थायी समितीच्या अध्यक्षपदी वीणा श्रीशैल विजापुरे यांची नियुक्ती करण्यात आली. नगरनियोजन व विकास स्थायी समिती अध्यक्षपदी वाणी विलास जोशी, लेखा स्थायी समिती अध्यक्षपदी सविता मुरगेंद्रगौडा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तर सार्वजनिक शिक्षण, आरोग्य व सामाजिक न्याय समितीच्या अध्यक्षपदी रवी धोत्रे यांची नियुक्ती केली आहे.
महापौर शोभा सोमनाचे यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहामध्ये बैठक झाली. त्यानंतर सर्व समित्यांच्या सदस्यांबरोबर चर्चा करून या सर्वांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. दि. 1 जुलै रोजी सर्व स्थायी समित्यांची निवड 5:2 फॉर्म्युल्यानुसार बिनविरोध झाली होती. भाजप व काँग्रेसने या फॉर्म्युल्यानुसार ही निवडणूक पार पाडल्यानंतर अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपमधील सदस्यांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी अध्यक्ष निवड झाली. त्यामध्ये महिलांनी बाजी मारल्याचे दिसून आले. शहराचा विकास करण्यासाठी आम्ही एकजुटीने यापुढे काम करू, असे आश्वासन यावेळी नियुक्त झालेल्या अध्यक्षांनी दिले.









