पद्मश्रीप्राप्त संतोष यादव यांना केले आमंत्रित
वृत्तसंस्था / नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दरवर्षी विजयादशमीनिमित्त नागपूर येथील स्वतःच्या मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करतो. परंतु यंदाचा हा कार्यक्रम विशेष अन् ऐतिहासिक ठरणार आहे. संघाने स्वतःच्या इतिहासाच्या 92 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या महिलेला कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. 5 ऑक्टोबर रोजी दसऱयानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
100 वर्षांच्या दिशेने वाटचाल करणारा संघ महिला अधिकारांवरून सक्रीय आहे. गिर्यारोहक आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त संतोष यादव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या आयोजनात मुख्य वक्ते म्हणून सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार असल्याचे संघाचे पदाधिकारी राजेश लोया यांनी सांगितले आहे.
दसऱयानिमित्त सरसंघचालकांकडून करण्यात येणारे मार्गदर्शन संघात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिनी संघ परिवाराचा प्रमुख देश आणि समाजाच्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर भूमिका मांडत असतो. या भाषणाकडे संघाचा अजेंडा म्हणून पाहिले जात असते. संतोष यादव या दोनवेळा माउंट एव्हरेस्ट सर करणाऱया पहिल्या महिला आहेत. मे 1992 मध्ये त्यांनी पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर सर केले होते. त्यानंतर मे 1993 मध्ये त्यांनी दुसऱयांदा अशी कामगिरी केली होती. संतोष यादव यांना 1994 मध्ये नॅशनल ऍडव्हेंचर पुरस्कार आणि 2000 साली पद्मश्रीने गौरविण्यात आले होते.









