हालभावी येथील महिलेच्या घराला घेराव : पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
बेळगाव : महिला स्वसाहाय्य संघाच्या माध्यमातून शेकडो महिलांची फसवणूक झाली आहे. ज्या महिलेने फसवणूक केली आहे, त्या महिलेच्या घरासमोर फशी पडलेल्या महिलांनी धरणे धरले. सोमवारी ही घटना घडली असून संबंधित महिलेविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. हालभावी (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर एम. बी., काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रमाणात महिलांची फसवणूक झाली असून फशी पडलेल्या महिलांचा आक्रोश लक्षात घेऊन हालभावी येथे बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. काकती पोलिसांनी यल्लव्वा बन्नीबागी या महिलेची चौकशी सुरू केली असून रात्री उशिरापर्यंत तिच्यावर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यल्लव्वा व तिचा पती कमलेशकुमार या दोघा जणांनी राणी चन्नम्मा स्वसाहाय्य संघाच्या माध्यमातून निरक्षर महिलांना 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देण्याचे सांगून फसवणूक केली आहे.
50 हजारांचे कर्ज मिळवून दिल्यानंतर 25 हजार रुपये यल्लव्वा आपल्याकडे घेत होती. केवळ 25 हजार संबंधित महिलांना देत होती. यापुढे तुम्ही कर्ज भरायची गरज नाही, तुम्ही घेतलेले कर्ज आम्हीच भरणार आहे, असे सांगण्यात येत होते. शेवटी थकबाकी वाढल्यामुळे कर्ज घेतलेल्या महिलांना बँकांकडून नोटिसा सुरू झाल्या. त्यामुळे आपण फसलो गेलो, हे त्या महिलांच्या लक्षात आले. ठरल्याप्रमाणे उर्वरित कर्जाचा भरणा तुम्हीच करा, अशी मागणी करीत फशी पडलेल्या महिलांनी यल्लव्वाच्या घराला घेराव घातला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तिला ताब्यात घेऊन काकती पोलीस स्थानकात आणले. मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून चौकशी पूर्ण झाल्यावरच यासंबंधीची अधिक माहिती उपलब्ध होणार आहे. यल्लव्वाने नेमके किती महिलांच्या नावे कर्ज उचलले आहे, त्याचा आकडा किती, याचा उलगडा झाला नाही. मात्र, घराला घेराव घातलेल्या महिलांची संख्या लक्षात घेता हा आकडा मोठा असल्याचे पोलिसांनी सांगितले.









