चिपळूण :
जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून अनुदानावर कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका महिलेस चिपळूण पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणात फसवणूक झालेल्या अन्य महिला सोमवारी मोठ्या संख्येने पुढे आल्या. यातील काहींनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दिला. त्याचबरोबर संबंधित महिलेवर कठोर कारवाई करावी. तसेच पैसे परत मिळवून न्याय देण्याची मागणी पोलिसांकडे केल्याची माहिती फसवणूक झालेल्या महिलांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून 10 लाखाचे कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. दरम्यान, फसवणूक प्रकरण बाहेर आल्यानंतर सोमवारी शिरगांव येथील सामाजिक कार्यकर्ते भरत लब्धे यांच्यासह फसवणूक झालेल्या भोम येथील रोहिणी चव्हाण यांच्यासह नेहा खातू यांनी पत्रकारांना सांगितले की, मुद्रा, पीएमजीपी, सीएमजीपी आदी शासकीय योजनेतून विविध उद्योगांसाठी 35 टक्क्यांपर्यंत अनुदानही उपलब्ध करून दिले जाते.
10 लाखाचे कर्ज घेतल्यास साडेतीन लाखाचे अनुदान मिळते. बँकांकडे कर्जाची मागणी केल्यास विविध कागदपत्रे द्यावी लागतात. अनेकदा ती देऊनही व्यावसायिक कर्ज मिळेलच, याची शाश्वती नसते. मात्र या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिलेसह तिच्या पतीने महिलांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या कामाच्या मोबदल्यात 30 हजार ते 1 लाखापर्यंतची रक्कम कर्ज हवे असणाऱ्यांकडून घेतली. काही महिला व नागरिकांनी रोख, धनादेश, गुगल पेद्वारे पैसे दिले. मात्र त्यानंतर कर्ज मंजूर न झाल्याने काही लोकांनी थेट जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, संबंधित बॅंकांचे अधिकारी यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी या महिलेकडून फसगत झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, दिलेल्या पैशाची मागणी केल्यानंतर गुन्हा दाखल झालेल्या महिलेसह तिच्या पतीकडून अश्लील शिवीगाळ केली जाते. पुरुषांना विनयभंगाचा, अब्रुनुकसानीचा दावा तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. त्यामुळे आम्ही फसलो आता तुम्ही फसू नका, असेही आवाहन या महिलांनी नागरिकांना केले आहे.
- महिलेला 19 पर्यंत पोलीस कोठडी
फसवणूक झालेल्यांमध्ये जिह्यातील नागरिकांचा समावेश आहे. जास्त प्रमाणात चिपळूण तालुक्यातील लोकांची फसगत झाली असून याप्रकरणी संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत अटकही केली आहे. त्यानुसार तिला येथील न्यायालयात हजर केले असता 19 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.








