खून आर्थिक व्यवहारातून, मायलेकीसह तिघांना अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
लक्ष्मीनगर, हिंडलगा येथील महिलेच्या खुनाचे गूढ उकलण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे. केवळ चार दिवसांत या प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. आर्थिक व्यवहारातून ही घटना घडली असून गणेशपूर येथील मायलेकीसह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी ही माहिती दिली आहे.
सोमवार दि. 21 एप्रिल रोजी लक्ष्मीनगर हिंडलगा येथील गणेश रेसिडेन्सी या अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या अंजना अजित द•ाrकर (वय 52) या महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी अंजनाच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला होता. खुनानंतर अंजना यांच्या अंगावरील दागिनेही पळविण्यात आले होते. त्यामुळे दागिने पळविण्यासाठी महिलेचा खून केला का? असा संशय निर्माण झाला होता.
खडेबाजारचे एसीपी शेखराप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला, उपनिरीक्षक ए. रुक्मिणी, हवालदार बसवराज उज्जनकोप्प, जे. एस. लमाणी, एम. एन. तेली, आर. बी. मदीहळ्ळी, उद्यमबाग पोलीस स्थानकातील एच. वाय. विभुती, यासीन नदाफ, खडेबाजार पोलीस स्थानकातील ए. बी. शेट्टी, बरमण्णा करेगार, टिळकवाडी पोलीस स्थानकातील एन. डी. तळवार व तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशीद आदींचा समावेश असलेल्या विशेष पथकाने या प्रकरणाचा छडा लावला आहे.
ज्योती बांदेकर (वय 46), मुलगी सुहानी बांदेकर (वय 19) व 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला (सर्वजण रा. गणेशपूर) पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 1 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. केवळ चार दिवसांत खून प्रकरणाचे गूढ उकलण्यात विशेष पथकाला यश आले आहे. चोरी, दरोड्यासाठी या महिलेचा खून केल्याच्या संशयाने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार 15 हजार रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून ही घटना घडली आहे. खून झालेल्या अंजना यांनी ज्योती बांदेकरला कोरोनाच्या काळात 15 हजार रुपये हात उसणे दिले होते. यापैकी बरीच रक्कम ज्योतीने परत केली होती. सोमवारी सकाळी याच पैशांसाठी अंजना यांनी ज्योतीच्या घरी जाऊन विचारणा केली होती. यावेळी उभयतांत वादावादी झाली. तुम्ही घरी चला आम्ही तेथेच येतो, असे सांगून ज्योतीने अंजना यांना घरी पाठविले होते.
आपल्या दोन मुलांना घेऊन ज्योती लक्ष्मीनगर हिंडलगा येथील अंजना यांच्या घरी पोहोचल्या. यावेळी आर्थिक व्यवहारातून पुन्हा वादावादीची घटना घडली. वादावादीनंतर झालेल्या मारहाणीत अंजना यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर गळा आवळल्याने त्यांचा मृत्यू झाला. दागिने चोरण्यासाठी हा खून झाला आहे हे भासविण्यासाठी अंजना यांच्या अंगावरील दागिने काढून घेण्यात आले. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशीही केली. मात्र वैज्ञानिक पद्धतीने झालेल्या चौकशीनंतर हा सारा प्रकार उघडकीस आला आहे.









