विधानसौधजवळ भामट्यांचा प्रताप
बेळगाव : दुचाकीला पाठीमागून धडक देऊन अपघात घडवून खाली पडलेल्या महिलेला वर उचलण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याची घटना पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगाजवळ घडली आहे. मोटारसायकलवरून पाठलाग करणाऱ्या शिक्षकाला हेल्मेटने मारहाण करून भामट्यांनी पलायन केले आहे. शुक्रवार दि. 18 एप्रिल रोजी रात्री सुवर्ण विधानसौधपासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. या परिसरात नेहमी पोलिसांचा वावर असतो. तरीही भामट्यांनी दाम्पत्यावर हल्ला करून मंगळसूत्र पळविले आहे. शनिवारी 19 एप्रिल रोजी दुपारी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक एस. के. होळेण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. भामट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही.
अपघात घडवून मंगळसूत्र पळविल्याच्या घटनेने रात्रीच्या वेळी प्रवास करताना बेळगाव व परिसर किती सुरक्षित आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मूळचे डोंबरकोप्प, ता. कित्तूर येथील शंकऱ्याप्पा महाराजप्पा दुदमी (वय 37) हे शिक्षक आहेत. सध्या विजयनगर-हलगा येथे त्यांचे वास्तव्य आहे. शुक्रवारी रात्री आपली पत्नी व मुलांसमवेत केए 22 ईएक्स 1861 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून हलगा सर्व्हिस रोडवरून आपल्या घरी जात होते. रिलायन्सजवळ चेहऱ्याला मास्क बांधलेल्या दोघा भामट्यांनी पाठीमागून दुचाकीने धडक दिली. या घटनेनंतर शंकऱ्याप्पा यांची पत्नी व मुले खाली पडली. पत्नीला वर उचलण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. सुमारे पाच ते दहा ग्रॅमचा तुकडा भामट्याच्या हाती लागला. मंगळसूत्र घेऊन आपल्या दुचाकीवरून दोघांनी तेथून पलायन केले. शंकऱ्याप्पा यांनी मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला. विज्ञान वनाजवळ हेल्मेटने शिक्षकावर हल्ला करून भामट्यांनी तेथून पलायन केले. हिरेबागेवाडी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.









