बेळगाव :
मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन पलायन केल्याची घटना शनिवारी दुपारी महांतेशनगर येथील आरती मेडिकल्स क्रॉसजवळ घडली आहे. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मलप्रभा मल्लिकार्जुन पाटील (वय 50) रा. शिवतीर्थ कॉलनी, महांतेशनगर यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मलप्रभा बसमधून उतरून पायी चालत आपल्या घरी जात होत्या. मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग करणाऱ्या दोघा भामट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या भामट्याने मोटारसायकलवरून उतरून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व मोबाईल हिसकावून घेऊन पलायन केले.
घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. भामट्यांचा शोध घेण्यासाठी कणबर्गी रोडसह वेगवेगळ्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.









