115 वर्षांच्या इतिहासात पहिलीच घटना : ब्लेज मेट्रेवली यांचे बाँड कनेक्शन
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआय6च्या 115 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला प्रमुख नियुक्त होणार आहे. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी या पदासाठी ब्लेज मेट्रेवली यांच्या नावाची घोषणा केली. ब्लेज मेट्रेवली एमआय6च्या इतिहासात 18 व्या प्रमुख आणि हे पद सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरणार असल्याचे ब्रिटनकडून सोमवारी सांगण्यात आले. ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेत अडीच दशकांपर्यंत काम केलेल्या ब्लेज चालू वर्षाच्या अखेरीस प्रमुखपदाची धुरा हाती घेतील. त्या रिचर्ड मूर यांची जागा घेतील. रिचर्ड मूर हे 2020 पासून यंत्रणेचे नेतृत्व करत आहेत.
ब्लेज मेट्रेवली ब्रिटनच्या वरिष्ठ गुप्तचर अधिकारी आहेत, त्यांच्याकडे या क्षेत्रातील 26 वर्षांचा अनुभव आहे. 1999 मध्ये गुप्तचर सेवेत सामील होणाऱ्या आणि सध्या 47 वर्षे वय असणाऱ्या मेट्रेवली सध्या गुप्तचर यंत्रणेच्या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष विभागाच्या (क्यू सेक्शन) महासंचालिका आहेत. ब्लेज यांची एमआय6च्या प्रमुख म्हणून निवड ही सायबर हल्ले चिंतेचे कारण ठरत असताना झाली आहे.
आकर्षक कारकीर्द
मेट्रेवली यांनी एमआय6 चे नेतृत्व करण्याची संधी मिळणे मोठा सन्मान असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांची ही नियुक्ती ब्रिटिश गुप्तचर जगतात 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून चालत आलेली पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढणारी आहे. कॅम्ब्रिजच्या पेम्ब्रोक कॉलेज मध्ये मानवशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या मेट्रेवली यांनी गुप्तचर अधिकारी म्हणून स्वत:ची बहुतांश कारकीर्द पश्चिम आशिया अणि युरोपमध्ये ऑपरेशन्स भूमिकांमध्ये घालविली आहे. मेट्रेवली यांनी एमआय5 या ब्रिटनच्या अंतर्गत गुप्तचर यंत्रणेतही विविध वरिष्ठ पदांवर काम केले आहे.
ब्रिटनची एमआय6 विदेशात गुप्त मोहिमा राबवत असते. ही यंत्रणा एमआय5 आणि डिजिटल देखरेख शाखा जीसीएचक्यूसोबत काम करते. एमआय6, एमआय5 आणि जीसीएचक्यूसोबत मिळून ब्रिटिश लोकांना सुरक्षित ठेवणे आणि विदेशात ब्रिटनच्या हितांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. एमआय6 च्या शूर एजंट्स आणि आमच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत काम जारी ठेवण्यासाठी उत्सुक असल्याचे मेट्रेवली यांनी म्हटले आहे.
सध्या क्यू सेक्शनमध्ये कार्यरत
मेट्रेवली सध्या एमआय 6च्या क्यू सेक्शनचे नेतृत्व करत आहे. हा सेक्शन यंत्रणेच्या अत्याधुनिक तांत्रिक ऑपरेशन्सना हाताळतो. याच विभागाचे नाव जेम्स बाँड चित्रपटांमध्ये दिसून येणाऱ्या काल्पनिक ‘क्यू ब्रँच’मध्ये वापरला जात राहिला आहे. येथे हेरांसाठी गॅझेट आणि तंत्रज्ञान विकसित केले जाते.









