इंटरनेट सेवेवरील बंदी पाच दिवसांनी वाढविली
वृत्तसंस्था /इंफाळ
मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यात गुऊवारी एका महिलेची शाळेबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येच्या या घटनेमुळे परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली असून हल्लेखोरांचाही शोध घेतला जात आहे. राज्यात 64 दिवसांपासून कुकी आणि मैतेई समुदायातील लोकांमध्ये हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 135 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून 400 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, राज्यातील हिंसाचार अद्याप कमी न झाल्याने सरकारने इंटरनेट बंदीची मर्यादा आणखी पाच दिवसांनी वाढवली आहे. तसेच राज्यातील 16 पैकी 5 जिल्ह्यांमधून संचारबंदी उठवण्यात आली आहे. आता 11 जिल्ह्यांमध्ये सायंकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी सुरू आहे.
मणिपूर सरकारने आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालये अद्याप सुरू होणार नाहीत. सदर शाळा-महाविद्यालयांमध्ये मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. या छावण्यांमध्ये सध्या 50 हजारांहून अधिक लोक राहत आहेत. बऱ्याच भागात अजूनही हिंसाचार सुरू असल्यामुळे शाळा सुरू होण्यासह दैनंदिन व्यवहार पूर्ववत करण्यासाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात बुधवारी जमावाने भारतीय राखीव बटालियन पॅम्पवर हल्ला करत शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी जमाव आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. सशस्त्र जमावाने गोळीबार केल्याने लष्करालाही गोळीबार करावा लागला. या संघर्षात एक 27 वषीय जवान हुतात्मा झाला आहे.









