चोरट्यांनीच खून केल्याचा संशय : मयत महिलेच्या अंगावरील दागिने गायब, तपास सुरू
बेळगाव : लक्ष्मीनगर-हिंडलगा येथील गणेश रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवार दि. 21 रोजी सायंकाळी 7.25 च्या दरम्यान उघडकीस आली. अंजना अजित दड्डीकर (वय 52) असे मृत महिलेचे नाव असून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले आणि अंगठी गायब झाली असल्याने कोणीतरी चोरीच्या किंवा अन्य कोणत्या तरी उद्देशाने खून केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. कॅम्प पोलीस स्थानकात खुनाच्या घटनेची नोंद झाली आहे.
याप्रकरणी अक्षता सुरज पाटील (वय 32, रा. शिवम सोसायटी, शाहूनगर) यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, अंजना या आपल्या पतीसोबत गेल्या काही वर्षांपासून एसएएफ 04, गणेश रेसिडेन्सी लक्ष्मीनगर येथील अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत होत्या.त्यांना दोन मुली असून मुलींचे लग्न करून दिल्याने दोघीही सासरी असतात. तर दड्डीकर दाम्पत्य अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांचे पती अजित हे रिक्षाचालक असून सोमवारी सकाळी 10.30 च्या दरम्यान ते नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन बाहेर पडले होते. दिवसभर रिक्षा चालवून सायंकाळी 7.25 च्या दरम्यान ते घरी परतल्यानंतर स्वयंपाक खोलीत पत्नी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे उपचारासाठी पत्नीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घडलेली माहिती अजित यांनी कॅम्प पोलिसांना दिली. त्यानंतर लागलीच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, खडेबाजार उपविभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त एच. शेखराप्पा यांनी भेट देऊन पाहणी केली. तर कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा करून कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. मारेकऱ्यांनी अंजना यांचा गळा आवळून खून केल्याचे यावेळी दिसून आले. अंजना यांचा मृतदेह स्वयंपाक खोलीत पडला होता. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने पळविण्यासाठी हा खून केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कारण त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले आणि अंगठी गायब झाली असल्याचे दिसून आल्याने नातेवाईक व पोलिसांनी हा निष्कर्ष लावला आहे. अक्षता सुरज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून घेऊन तपास चालविला आहे.
मृतदेह स्वयंपाक खोलीत
पती अजित हे व्यवसायाने ऑटो रिक्षाचालक असून ते सकाळी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर पत्नी स्वयंपाक खोलीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी अंगावरील दागिने हिसकावून नेण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने अपार्टमेंटमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी हे कृत्य केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास चक्रे गतिमान केली आहेत.









