सदाशिवनगर येथील घटनेने खळबळ, पाच तासांत आरोपीला अटक
बेळगाव : खानावळीत काम करणाऱ्या एका महिलेचा खून करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्सपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली असून खुनाच्या घटनेनंतर केवळ पाच तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकारांना यासंबंधी माहिती दिली. यावेळी पोलीस उपायुक्त नारायण बरमणी उपस्थित होते. महादेवी भागाप्पा करेन्नावर (वय 42) राहणार सदाशिवनगर, पहिला क्रॉस असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री 11.09 वाजण्याच्या सुमारास सदाशिवनगर येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाशेजारील रस्त्यावर ही घटना घडली आहे. या प्रकरणी संतोष थावरू जाधव (वय 32) राहणार श्रीनगर या ऑटोरिक्षाचालकाला अटक केली आहे.
खुनाच्या घटनेनंतर केवळ पाच तासात वीरभद्रनगर परिसरात आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त, उपायुक्तांसह शहरातील अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयित आरोपी संतोष जाधव हा व्यवसायाने ऑटोरिक्षाचालक आहे. खून झालेली महादेवी व संतोष यांचा परिचय होता. दीड वर्षापूर्वी संतोषने महादेवीकडून 10 हजार रुपये उसने घेतले होते. घेतलेले पैसे परत मागितल्यामुळे मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा लोखंडी रॉडने डोक्यावर हल्ला करून संतोषने तिचा खून केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक यु. एस. आवटी, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांबरोबरच तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. खुनासाठी वापरण्यात आलेले रॉड पोलिसांनी जप्त केले असून या प्रकरणी संतोषची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.









