हत्येनंतरचा अनुभव जाणून घेण्यासाठी गुन्हा
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमध्ये क्रिमिनोलॉजीच्या विद्यार्थ्याने दोन महिलांवर हल्ला करत एकीची हत्या केली आहे. तर दुसरी महिला जखमी आहे. नासेन सादी (20 वर्षे) नावाचा हा विद्यार्थी कुणाची हत्या केल्यावर काय वाटते हे जाणून घेऊ इच्छित होता. याकरता त्याने एप्रिल महिन्यापासूनच कुणाची हत्या करण्याचा प्लॅन तयार करण्यास सुरुवात केली होती.
हत्येसाठी योग्य ठिकाण निवडल्यावर तो दक्षिण इंग्लंडमधील समुद्रकिनारी असलेल्या बोर्नमाउथ शहरात राहण्यासाठी आला होता. कुणाची हत्या केल्यावर कसे वाटते हे तो जाणून घेऊ इच्छित होता. महिलांना भयभीत केल्यावर कशाप्रकारचा अनुभव येतो हे देखील तो समजून घेऊ इच्छित होता. अशाप्रकारच्या कृत्यामुळे शक्तिशाली झाल्याचे वाटेल अणि अन्य लोकांमध्ये आपल्याबद्दल स्वारस्य निर्माण होईल असे त्याला वाटत होते अशी माहिती प्रॉसिक्यूटर सारा जोन्स यांनी विंचेस्टर क्राउन न्यायालयात दिली आहे.
नासेन सादीने लीन माइल्स आणि एमी ग्रे या समुद्रकिनारी बसल्या असताना त्यांच्यावर हल्ला केला होता. एमी ग्रे यांच्यावर चाकूने 40 वार करण्यात आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर लीन माइल्स या चाकूचे 20 वार झाल्यावरही बचावल्या आहेत.
हल्ला अत्यंत भयानक होता. महिला जीव वाचविण्यासाठी पळू लागल्यावर हल्लेखोराने पाठलाग करत त्यांच्यावर वार केले आहेत. हल्ला केल्यावर नासेने चाकू फेकून देत स्वत:चे कपडे बदलत पळ काढला होता. पोलिसानी नासेन सादीच्या घराची झडती घेतली असता अनेक चाकू सापडले आहेत.









