वृत्तसंस्था/ नोएडा
उत्तरप्रदेशाच्या नोएडा येथील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा पती नितिन सिन्हाला अटक केली आहे. आरोपी स्वत:च्या घरातील स्टोअर रुममध्ये लपून बसला होता. या घरातील पहिल्या मजल्यावर महिलेचा मृतदेह आढळून आला होता. नितिनने स्वत:ची पत्नी रेणू सिन्हाची हत्या मालमत्ता वादातून केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. आरोपी नितिन सिन्हा हा इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसमध्ये कार्यरत होता.
रेणु सिन्हाचा भाऊ तिला दोन दिवसांपासून फोन करत होता, परंतु कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर महिला वकिलाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेनंतर मृत महिलेचा पती फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली होती. आरोपीचा मोबाइल ऑन होता, त्याचे लोकेशन ट्रॅक केल्यावर ते घरानजीकच दिसून येत होते. सोमवारी पोलिसांनी पहिल्या मजल्यावर स्टोअररुममध्ये पाहिल्यावर तेथे आरोपी दिसून आला. आरोपीला संबंधित घर विकायचे होते, तर त्याच्या पत्नीचा याला विरोध होता. यातूनच आरोपीने पत्नीची हत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे.









