हल्लेखोराचे आत्मसमर्पण : पंजाब पोलिसांकडून कसून तपास
► वृत्तसंस्था / अमृतसर
पंजाबमधील पतियाळा येथील गुरुद्वारामध्ये एका भाविकाने रविवारी रात्री 10 वाजता एका महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. गुरुद्वारा आवारातील तलावाजवळ सदर महिला दारू पीत होती, असा आरोप आहे. या गोळीबारात एक जवानही जखमी झाला आहे. निर्मलजीत सिंग असे आरोपीचे नाव असून तो पतियाळा येथील रहिवासी आहे. तो प्रॉपर्टी डीलर असून त्याला अटक करण्यात आली आहे. हत्येनंतर आरोपीने आत्मसमर्पण केले. हल्लेखोराविरुद्ध हत्या आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडील रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आले आहे. वस्तुस्थितीची पडताळणी करण्यासाठी पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून अधिक तपास करत आहेत.
परविंदर कौर (32) असे मृत महिलेचे नाव असून आरोपीविऊद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आल्याचे पतियाळा एसएसपी वरुण शर्मा यांनी सांगितले. संबंधित महिला गुरुद्वाराच्या आवारात तलावाजवळ बसून दारू पीत होती. ही महिला दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती रविवारी झिरकपूरहून बसमधून पतियाळाला आली होती. ज्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आली ती परवानाधारक होती, असेही ते पुढे म्हणाले. दारू पीत असल्यामुळे गुरुद्वाराच्या कर्मचाऱ्यांनीही तिला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु ती ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हती. याचदरम्यान निर्मलजीतने परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून पाच गोळ्या झाडल्या. महिलेला तीन गोळ्या लागल्या, तर सेवादार सागर कुमार यांनाही गोळी लागली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. सागरला राजिंद्र ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.









