इस्लामपूर :
येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरातील बेघर वसाहतीमधील जयगड बिल्डिंग मधील महिला सिलेंडर स्फोटात ठार झाली. अन्नपूर्णा परशुराम कमादगी असे या महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील बेघर बसाहतीती मधील जयगड बिल्डिंग मध्ये महिला रहात होती. सोमवारी सायंकाळी सिलेंडरचा स्फोट होवून ती गंभीर भाजली. या महिलेस नातेवाईक अनिकेत कमादगी यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रात्री साडेसात वाजता सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले. त्याठिकाणी उपचार सुरु होते. पण मंगळवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अन्नपूर्णा कमादगी यांचा मृत्यू झाला.
या घटनेत घराचे किंवा आजूबाजूचे काही नुकसान झालेले नाही. या महिलेस एक सहा-सात महिन्यांचे मुल असल्याचे बेघर वसाहतीमधील लोकांनी सांगितले. तेही यामध्ये किरकोळ भाजले असून त्याच्यावर उपचार करुन बेघर वसाहती मधील एका सामाजिक कार्यकर्त्याकडे पोलिसांनी सोपवले असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. विनायक पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत.








