राजापूर :
तालुक्यातील ओझर-ओणी मार्गावरून दुचाकीने प्रवास करणाऱ्या पती, पत्नी आणि मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी घडली. यामध्ये अमिना मन्सूर मापारी या महिलेच्या पायाला बिबट्याची नखे लागल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओझर येथील मन्सूर अकबर मापारी हे त्यांची पत्नी व मुलगा यांच्यासह दुचाकीने ओझर-ओणी मार्गावरून राजापूरच्या दिशेने येत होते. सकाळी 9 वाजता ते तिवरे येथील खरब येथे आले असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या घटनेत मन्सूर यांची पत्नी अमिना मापारी यांच्या उजव्या पायाच्या खालच्या बाजूला बिबट्याची नखे लागली. त्यांना तत्काळ उपचारासाठी ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती वनविभागाने दिली.
या घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी यांनी रुग्णालयात जावून त्यांची विचारपूस कऊन त्यांचा जाबजबाब नोंदवला आहे. तसेच घटनास्थळी जाऊन प्राथमिक पाहणीही करण्यात आली आहे. यावेळी राजापूर वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, नीतेश गुरव आदी उपस्थित होते. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, ओझर-ओणी मार्गावरील तिवरे-खरब येथे रस्त्याच्या कडेला बिबट्याची पिल्ले असल्याचे या मार्गावरून जाणाऱ्या एका वाहनचालकाच्या निदर्शनास आले. ही पिल्ले पाहण्यासाठी या वाहनातील प्रवासी गाडी थांबवून रस्त्यावर उतरले होते. याचदरम्यान मन्सूर मापारी हे कुटुंबासह दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. मात्र हे वाहन तेथून निघून जाताच बिबट्याने अमिना यांच्यावर झडप घालून जखमी केल्याची माहिती समोर आली आहे.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्यावतीने विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी केली आहे.
..








