खानापूर बस आगाराचा भोंगळ कारभार
खानापूर : धावत्या बसमधून पायातील प्लायवूड तुटल्याने बसमधून महिला पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी खानापूर-नंदगड रस्त्यावरील रुमेवाडी नाका येथे घडली. या अपघातामुळे खानापूर बस आगाराचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. सुदैवाने महिला वाचली आहे. खानापूर आगाराची क्र. के. ए. 22 एफ 1972 खानापूर-गोदगेरी ही बस खानापूरहून गोदगेरीकडे निघाली होती. बसमध्ये गर्दी असल्याने काही महिला उभे राहून प्रवास करत होत्या. या दरम्यान, बस रुमेवाडी नाका येथील गतिरोधकावरून जाताना धक्क्यामुळे बसच्या आतमध्ये पत्रा निकामी झाल्याने त्या ठिकाणी प्लायवूड घातले होते.
हा प्लायवूड कुजून गेल्याने गतिरोधकाच्या धक्क्यामुळे प्लायवूडसह उभी असलेली महिला प्रवासी पद्मिनी भुजंग कदम (वय 60), राहणार निडगल ही महिला बसमधून खाली कोसळली. इतर महिलांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आणि आरडाओरड केल्याने काही अंतरावर बस थांबली. मात्र खाली कोसळलेली महिला सुदैवाने बचावली आहे. डोकीला आणि हाताला किरकोळ जखम झाल्याने खानापूर येथील सरकारी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. खानापूर बस आगाराच्या कारभाराबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र बस आगाराचा कारभार अद्यापही सुधारलेला नाही. याबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गांभीर्याने घेऊन बस आगारप्रमुखांना सक्त सूचना देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ करू नये तसेच सुरक्षिततेच्याबाबत कोणतीही तडजोड करू नये, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेतून व्यक्त करण्यात येत आहेत.









