खानापूर तालुक्यातील परिस्थिती : आमगाव शासनाच्या सुविधांपासून अद्याप वंचित
खानापूर : स्वातंत्र्यानंतर 75 वर्षाच्या काळातही उपचारासाठी महिलेला तिरडीवरून चार किलोमीटर आणावे लागते, ही खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील 21 व्या शतकातील शोकांतिका आहे. खानापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम आणि चेरापुंजीनंतर जास्तीत जास्त पाऊस होणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले आमगाव या ठिकाणी कोणतीच वाहतूक सुविधा नाही. मात्र येथील लोक आपले जीवन निसर्गाशी जुळून घेऊन जगत आहेत. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने या गावचा संपर्क तुटलेला असतो. गणपतीनंतरच या गावचा संपर्क तालुक्यासह इतर गावाशी होतो. या गावातील लोक गणपतीपर्यंतचा बाजार एकाचवेळी भरून ठेवतात. शिक्षकही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदाच आपल्या गावी येतो. याच गावातील दोन अतिथी शिक्षकांवर ही शाळा चालते. एक कन्नड शिक्षक बाहेरगावातील आहे. शुक्रवारी दुपारी आमगाव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38) हिला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली. त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला.
मात्र तिचा श्वास अडखळल्याने तिला उपचारासाठी खानापूरला घेऊन येण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. मात्र तिला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी यंत्रणा नसल्याने ते हतबल होते. अखेर कन्नड शिक्षक बाळेकुंद्री यांनी 108 या ऊग्णवाहिकेला संपर्क साधून नदीच्या पलीकडे येण्याची विनंती केली. यानंतर हर्षदा घाडी यांना तिरडीवरून गावातील 25/30 नागरिकांनी आळीपाळीने ओझे घेऊन नदीच्या काठापर्यंत आणले. रुग्णवाहिका नदीच्या पलीकडे येऊन उभी राहिली. या महिलेला तिरडीवरून 25 लोकांनी आळीपाळीने नदीच्या पलीकडच्या काठापर्यंत आणले. यानंतर ऊग्णवाहिकेतून या महिलेला खानापूर इस्पितळात आणल्यानंतर तिची प्रकृती अति गंभीर असल्याने तिला बेळगाव जिल्हा ऊग्णालयात हलविण्यात आले आहे. खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात आजही रस्ते वीज तसेच इतर अन्य सुविधा पासून वंचित आहे. मात्र आजही प्रशासन या दुर्गम भागातील नागरिकांना प्राथमिक सुविधा देण्यासाठी अपयशी ठरलेले आहे, हेच यावरून स्पष्ट होत आहे.









