वृत्तसंस्था/ पानिपत
हरियाणाच्या पानिपतमध्ये एका महिलेसोबत क्रौर्य घडले आहे. येथे स्थानकावर उभ्या रेल्वेडब्यात 35 वर्षीय महिलेवर तीन जणांनी बलात्कार केला, यानंतर आरोपींनी तिला सोनिपत येथे नेत रेल्वेमार्गावर फेकले होते, त्याचवेळी एक रेल्वे तेथून गेल्याने महिलेचा पाय तुटून पडला. गंभीर अवस्थेतील महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पीडित महिला स्वत:च्या घरातून 24 जून रोजी बाहेर पडली होती. ही महिला पतीसोबत झालेल्या भांडणानंतर घरातून बाहेर पडली होती. यापूर्वीही तिने अनेकदा असे केल्याने ती काही दिवसात परत येईल असे पतीला वाटले होते. परंतु दोन दिवसांपर्यंत ती न परतल्याने तिच्या पतीने ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती.
महिला रेल्वेस्थानकात असताना अनोळखी इसमाने तिच्या पतीने पाठविले असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला. मग या इसमाने या महिलेला रिकाम्या रेल्वेडब्यात नेत तिच्यावर बलात्कार केला, तेव्हा आणखी काही लोक तेथे पोहोचले. त्या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपींनी तिला धमकावून स्वत:सोबत सोनिपत येथे नेत रेल्वेमार्गावर फेकून दिले.









