अग्नीशामक दलाकडून शोध मोहिम
मडगाव : नाकेरी, बेतुल येथे काल बुधवारी सकाळी 10.30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान शेतात जाणारी कटा-फातर्पा येथील श्रीमती फ्लोरिना डिकॉस्ता (55) ही महिला ओहोळाच्या पाण्यात बुडाली. बुधवारी उशिरा पर्यंत मडगाव अग्नीशामक दला तर्फे शोध जारी होता. पण, ती साडपू शकली नाही. उपलब्ध माहिती प्रमाणे, फ्लोरिना डिकॉस्ता व रोझालिना सिमोईश (50) या कटा-फातर्पा येथील महिला सकाळी चर्च मध्ये प्रार्थनेला गेल्या होत्या. चर्चमधील प्रार्थना संपल्यानंतर तेथूनच त्या शेतात जाण्यासाठी निघाल्या. शेतात जाण्यासाठी त्यांना ओहोळ पार करावा लागतो. ओहोळात उतरताना दगडावर घसरून पाण्यात पडल्या.
ओहोळात पाणी जास्त असल्याने फ्लोरिना डिकॉस्ता पाण्यात बुडाल्या व वाहून गेल्या तर रोझालिना सिमोईश यांना एका झाडाचा आधार मिळाल्याने त्या बचावल्या. रोझालिना यांनी ही माहिती इतरांना दिल्यानंतर फ्लोरिनाचा शोध घेण्यास सुरवात झाली. अग्नीशामक दल तसेच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनीही शोध मोहिमेत भाग घेतला. पण, काल उशिरा पर्यंत ती सापडू शकली नाही. सायंकाळी 6.30 वा. अग्नीशामक दलाने शोध मोहिम थांबवली. आज गुरूवारी पुन्हा शोध मोहिम राबविली जाणार आहे. या घटनेची माहिती मिळताच केपेच्या उपजिल्हाधिकारी, अतिरीक्त जिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई, कुंकळळीचे पोलीस निरीक्षक तसेच फातर्पा व बेतुलचे सरपंच व पंच सदस्य घटनास्थळी दाखल झाले होते. केपेचे माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर तसेच सावित्री कवळेकर या देखील घटनास्थळी उपस्थित होत्या.









