घटनेनंतर स्थानिकांमध्ये आक्रोश
वृत्तसंस्था/ वायनाड
केरळच्या वायनाड येथील मननथावाडी गावातील प्रियदर्शिनी इस्टेटमध्ये शुक्रवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून त्यांनी निदर्शने केली आहेत. तर अलिकडेच राज्य विधानसभेत वनमंत्री ए.के. शशिंद्रन यांनी राज्यात मानव-प्राण्यांमधील संघर्ष कमी झाल्याचा दावा केला होता. राज्य सरकार याप्रकरणी प्रभावी उपाययोजना करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
प्रियदर्शिनी इस्टेटमध्ये वाघाच्या हल्ल्याची घटना घडल्यावर वनमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांसमोर भूमिका मांडली आहे. वाघाला पकडण्याचा किंवा मारण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या घटनेनंतर लोक निदर्शने कर तअसल्याचे शशिंद्रन यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे मागासवर्ग कल्याण मंत्री ओ.आर. केलू यांनी निदर्शकांशी चर्चा करण्यासाठी प्रियदर्शिनी इस्टेटमध्ये धाव घेतली. कॉफी तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला होता. वनअधिकाऱ्यांना गस्तदरम्यान महिलेचा मृतदेह मिळाला असे केलू यांनी सांगितले आहे.
स्थानिक लोकांनी महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यास विरोध दर्शविला. वाघाला पकडण्यात यावे किंवा ठार केले जावे अशी मागणी प्रियदर्शिनी इस्टेटच्या अनेक महिलांनी केली आहे. वाघाला पकडण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केल जात आहेत. या क्षेत्राच्या लोकांसाठी कमाल सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आरआयटी शाखांच्या तैनात समवेत अनेक पावले उचलण्यात येतील असे मंत्री केलू यांनी सांगितले आहे.









