सातारा :
सातारा शहरात गेल्या चार दिवसांपूर्वी अपघातात माजी सैनिकाचा बळी गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या नजिकच कारने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ती महिला सातारा नगरपालिकेची सफाई कामगार असून तिचे नाव सरस्वती नंदू वायदंडे (वय 44) असे आहे. तिच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबाची कर्ती महिलाच निघून गेल्याने वायदंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा शहरात आयजी सुनील फुलारी हे आले असल्याने पोलीस त्यांच्या गडबडीत आहेत. त्याच दरम्यान, बुधवारी सकाळी अतिशय रहदारीच्या असलेल्या रस्त्यावर राधिका रोडवरुन चार चाकी कार भरधाव वेगाने निघाली होती. त्या कारने तालुका पोलीस ठाण्याच्या कोपऱ्यावर चालत जाणाऱ्या सरस्वती वायदंडे यांना धडक दिली. सरस्वती वायदंडे या सकाळी करंजे परिसरात झाडू मारण्याचे काम करुन परत येत होत्या. त्या पायी चालत येत असताना त्यांना चार चाकी कार चालकाने धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले. झालेल्या अपघाताने एकच आवाज झाला. त्यानंतर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. लगेच अपघातस्थळी मोठी गर्दी झाली.
जखमी झालेल्या सरस्वती वायदंडे यांना क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्या सातारा नगरपालिकेच्या सफाई कामगार होत्या. त्यांच्या निधनाची बातमी सातारा नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी अरविंद दामले, आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड, निरीक्षक सागर बडेकर यांना समजताच त्यांनी त्यांच्या कुटुंबियाची भेट घेवून सांत्वन केले. सरस्वती वायदंडे यांना दोन मुली असून त्याच कर्त्या होत्या. त्यांच्या विवाहित मुलीने कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून याचा तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.
- अपघाताने वायदंडे कुटुंब उघड्यावर
सरस्वती वायदंडे यांच्या पतीच्या निधनानंतर त्याच कुटुंबाचा आधार होत्या. त्यांनी त्यांच्या दोन मुलींना शिक्षण दिले होते. मुलींना त्या कमी पडू देत नव्हत्या. आपले काम भले आणि आपण भले असा त्यांचा स्वभाव होता. आरोग्य विभागात सुद्धा त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक होत असे. त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंब उघड्यावर पडले आहे.








