चिपळूण :
तालुक्यातील खांदाट-मोरवणेफाटा येथे विवाहितेने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. पतीकडून होणारी मारहाण व सासूकडून शिवीगाळ तसेच दमदाटीला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची फिर्याद मृत विवाहितेच्या वडिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुरुवारी पतीसह सासूवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शकुंतला अशोक चव्हाण (27, खांदाट-मोरवणेफाटा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर अशोक मोतीराम चव्हाण, कमलाबाई मोतीराम चव्हाण (खांदाट-मोरवणेफाटा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद विनायक जयसिंग राठोड (55, लातूर) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शकुंतला चव्हाण ही विनायक राठोड यांची मुलगी आहे. राठोड यांचे जावई व शकुंतलाचा पती अशोक चव्हाण व त्यांची सासू कमलाबाई चव्हाण हे एकमेकांच्या संगनमताने शकुंतलाचा जाच करत असत. पती अशोक चव्हाणचे अन्य एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याने तो वारंवार घरामध्ये वाद करून शकुंतलाला लाथाबुक्क्मयाने मारहाण करत होता. तसेच सासू कमलाबाई चव्हाण याही शकुंतलाला शिवीगाळ, दमदाटी करून ‘तू माझ्या घरातून निघून जा, मला तुझी गरज नाही’ असे वारंवार बोलत असे. 2017 पासून सुरू असलेल्या शारीरिक, मानसिक त्रासाला व घरातील छळाला कंटाळून शपुंतला हिने बुधवारी राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे.








