पाणी तापविण्याच्या क्वॉईलमुळे दुर्घटना : परिसरात हळहळ
प्रतिनिधी /बेळगाव
पाणी तापविण्यासाठी बकेटमध्ये सोडलेल्या क्वॉईलमुळे विजेचा धक्का बसून एका तरुणीचा मृत्यू झाला. आनंदनगर, वडगाव येथे मंगळवारी सकाळी 10 वा. ही घटना घडली असून शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
देवांशी योगेंद्र चव्हाण (वय 17, मूळची रा. भवानीपेठ, सोलापूर) असे त्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. शाळेला सुटी असल्यामुळे देवांशी आईसोबत वडगाव येथील आजोळी आली होती. त्यावेळी ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी 10 वाजता ती स्नान करण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती. 15 ते 20 मिनिटे झाली तरी ती बाहेर आली नाही म्हणून आईने तिला हाक मारली. तरी आतून प्रतिसाद आला नाही. त्यावेळी बाथरूमचा दरवाजा फोडला असता बाथरूममध्ये धूर होता. त्यामुळे स्विच ऑफ करून कुटुंबीयांनी पाहिले असता पाणी तापविणाऱया बकेटमध्ये हात लागून तिला विजेचा धक्का बसल्याचे दिसून आले.









