कोल्हापूर :
शहरातील गंगावेश परिसरात सुभाष हरी कुलकर्णी यांची करणी काढण्यासाठी विविध धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली 84 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भोंदू बाबाच्या नऊ जणाच्या टोळी विरोधी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यातील संशयीत सिधुंदुर्ग जिल्हा पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीकला बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती. तिला गुऊवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने 14 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
संशयित पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक हिची या फसवणूक प्रकरणात काय भूमिका होती. तसेच फसवणूक केलेल्या सुमारे 84 लाखामधील तिच्या वाटणीला किती ऊपये आले. त्या पैश्याचे तिने काय केले. याबरोबर या टोळीत नऊ संशयीता व्यतिरिक्त अन्य कोणी संशयिताचा सहभाग आहे का. याचा कसून चौकशी केली जात आहे.
कारवाईचा अहवाल लवकरच वरिष्ठ पोलिसांकडे
शहरातील जुना राजवाडा पोलिसांनी फसवणूक प्रकरणात सिधुंदुर्ग जिल्हा पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल तृप्ती मुळीकला अटक केली आहे. तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्या विरोधातील केलेल्या कारवाईचा संपूर्ण अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लवकरच पाठविण्यात येणार आहे. या अहवालाची गांभीर्याने दखल घेऊन, नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात तिच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.








