सातारा :
सातारा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय कोणताही कागद टेबलावरुन हलत नाही. त्याचाच प्रत्यय एका तक्रारदारास आला. हुकूमनामा मुद्रांकित करुन घेण्यासाठी दि. 26 जुन रोजी मुंद्राक जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करुनही तो मिळत नव्हता. कार्यालयातील कनिष्ठ लिपीक पल्लवी रामदास गायकवाड हिने चक्क पाच हजार रुपयांची मागणी केली. ती स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडली असून तिच्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या कारवाईमुळे सातारा मुंद्राक जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे.
जाऊ तेथे खावू, सर्वसामान्यांना लुटून आमचेच पोट भरु या प्रमाणे सरकारी कर्मचारी टेबलाखालून खा खा खात आहेत. कामे मात्र, होत नाहीत. कामाच्या फाईलीसाठी पैशांची मागणी केली जात आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव एका तक्रारदारास आला. वडिलोपार्जिंत मिळकतीबाबत बहिण व भाऊ यांच्यात कौटुंबिक दिवाणी दावा सुरु होता. त्या दाव्यामध्ये बहिण व भाऊ यांच्यात तडजोड होवून हुकूमनामा झाला.
त्यानंतर तक्रारदार हे तलाठी कार्यालय सैदापूर येथे गेले असता त्यांनी तडजोड हुकूमनामा हा मुद्रांकित करुन आणा, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी प्रक्रियेची माहिती घेतली. दि. 26 जुन रोजी तडजोड हुकूमनामा हा मुद्रांकित करण्यासाठी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करुनही त्यांना संबंधित टेबलवरील कनिष्ठ लिपीक पल्लवी गायकवाड या काही केल्या मुद्रांकित हुकुमनामा करुन देईनात. त्यांना तक्रारदाराने गोडीगुलाबीत काम का होत नाही हे विचारणा केली असता 5 हजार रुपये त्या कामाचे लागतील अशी मागणी केली. त्यावरुन अगोदरच वैतागलेल्या तक्रारदाराने थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅप लावला. त्या ट्रॅपमध्ये अलगद पल्लवी गायकवाड ही सापडली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील पाटील, हवालदार राजपुरे, महिला पोलीस नाईक जाधव, महिला पोलीस शिपाई गुरव, पोलीस शिपाई थोरात यांनी सहभाग घेतला. याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे करत आहेत.








