अटकेतील संशयितांची संख्या 7 वर : महिलाच प्रमुख सूत्रधार?
बेळगाव : राजापूर, ता. मुडलगी येथील रियल इस्टेट व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी एका महिलेसह आणखी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. घटप्रभा पोलिसांनी ही कारवाई केली असून महिलाच प्रमुख संशयित असल्याचे सांगण्यात आले. मंजुळा रामगनट्टी (वय 40) रा. कोण्णूर, ता. गोकाक, परशराम कांबळे (वय 32) रा. जमखंडी, यल्लेश वालीकार (वय 28) रा. नागनूर के. एम., ता. हुक्केरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 7 वर पोहोचली आहे. दि. 14 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता राजापूर येथील बसवराज निलप्पा अंबी (वय 48) या रियल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करून 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली घटप्रभाचे पोलीस निरीक्षक एच. डी. मुल्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी निपाणीजवळ चौघा जणांना अटक केली होती. झटपट पैसे मिळविण्यासाठी योजना तयार करून रियल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मंजुळा रामगनट्टी या एका राजकीय पक्षाच्या गोकाक तालुका अध्यक्षा होत्या, अशी माहिती मिळाली असून त्यांच्यावर कुलगोड पोलीस स्थानकातही फसवणूक प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. या प्रकरणातील आणखी काही जण फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.









