पुणे / वार्ताहर :
पुण्याच्या वडगाव शेरी परिसरात रस्त्याने जाणाऱ्या दोघांवर शस्त्राने हल्ला करुन त्यांचा मोबाईल आणि मोटरसायकल पळवून नेल्याची घटना घडली.
याप्रकरणी तीन चोरटय़ांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओंकार शंकर साबळे (वय 21, रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकार 27 जून रोजी घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ओंकार साबळे आणि त्यांचा मावस भाऊ कोरेगाव पार्क येथील पालमुख हॉटेलचे काम उरकून दुचाकीवर आपल्या घरी जात होते. त्यावेळी पायातील बुटाची लेस बांधण्याकरीता ओंकारने दुचाकी रस्त्याच्या बाजूला थांबवली. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरटय़ांनी त्याचा आणि त्याच्या मावस भावाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याला ओंकारने विरोध केला असता चोरटय़ांनी धारधार शस्त्राने त्यांच्यावर वार केला. ओंकारने एक वार चुकवला. दुसरा वार त्याच्या उजव्या हाताच्या तीन बोटांवर झाल्याने तो जखमी झाला आहे.
दरम्यान, यावेळी ओंकारच्या मावस भावाने मध्यस्थी केली असता त्याच्या गालावर चोरटय़ांनी वार केला. त्यात तोही जखमी झाला. त्यानंतर या चोरटय़ांनी जबरदस्तीने तक्रारदार तरुणाची 20 हजार रुपये किमतीची मोटरसायकल आणि मोबाईल चोरून नेला. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस डोंबाळे करत आहेत.








