खेड :
गोव्यातील एका फसवणुकीच्या गुन्ह्यात बिहार येथून ताब्यात घेतलेला साक्षीदार गोवा पोलिसांची नजर चुकवून निसटल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास येथील रेल्वे स्थानकात घडली. या प्रकारानंतर गोवा पोलिसांची एकच धावपळ उडाली.
गोवा येथे घडलेल्या फसवणूक प्रकरणातील संशयितांच्या शोधार्थ गोवा पोलिसांनी कंबर कसली होती. या प्रकरणात सहभागी असलेल्या संशयितांबाबत बिहार येथील एका तऊणास माहिती असल्याची गोपनीय माहिती गोवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गोवा पोलीस बिहार येथून एका साक्षीदारास ताब्यात घेत रेल्वेने गोव्याच्या दिशेने निघाले होते. ही रेल्वे खेड स्थानकात थांबली असता ‘जरा बाहेरून आलो’ असे सांगत त्याने गोवा पोलिसांना चकवा दिला. साक्षीदार पसार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर गोवा पोलिसांनी स्थानक परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच सुगावा न लागल्याने अखेर गोवा पोलिसांनी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्याशी संपर्क साधत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. रेल्वेस्थानक परिसरासह मोक्याच्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली. त्यानुसार खेड पोलिसांनी नाकाबंदी करत पसार साक्षीदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सापडला नाही. या प्रकाराने गोवा पोलिसांची झोप उडाली आहे.








