आजचा दिवस हा भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. एका ऐतिहासिक क्षणाची आपल्याला आज प्रतिक्षा करायची आहे. भारताने अवकाशात सोडलेले चांद्रयान-3 हे यान आज सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार आहे. साऱ्या देशवासियांचेच नव्हे तर जागतिक पातळीवरही या घटनेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. गेल्याच आठवड्यात रशियाने सोडलेले चंद्रावरील त्यांचे यान चंद्रावर पोहोचताच जळून खाक झाले. भारताने 14 जुलै 2023 रोजी दु. 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून चांद्रयान-3 अवकाशात सोडले आणि आज 23 ऑगस्ट 2023 रोजी सायं. 5.47 वाजता ते चंद्रावर पोहोचणार आहे. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर जे 3.84 लाख कि. मी. आहे ते अंतर कापून चांद्रयान-3 हे चंद्रावर पोहोचणार आहे. एकंदरित भारताने आपल्या अंतरिक्ष योजनेत एक यशस्वी पाऊल पुढे टाकले आहे. चांद्रयान-2 मध्ये अपयश आल्याने खचून न जाता भारताने अर्थात इस्रोने अथक प्रयत्न केले आणि त्यातून चांद्रयान-3 ची योजना रचली गेली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एक ऐतिहासिक पाऊल पुढे टाकत साऱ्या जगात भारत आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, हेच दाखवून दिले आहे. आज सायंकाळी चांद्रयान-3 चे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होणार आहे, ज्याकरिता हा उपग्रह अवकाशात सोडलेला होता त्याचे उद्दिष्ट म्हणजेच चंद्रावर स्वारी! अवघ्या काही तासांवर हा ऐतिहासिक क्षण येऊन ठेपलेला आहे. आपण त्याचे साक्षीदार होणार आहोत. चंद्रावर नेमके काय आहे! कशी स्थिती आहे! याबाबत साऱ्यांनाच कमालीची उत्कंठा आहे. आज सायंकाळी चांद्रयान-3 चा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा राहील व तो म्हणजे अखेरची 15 मिनिटे ती फार संवेदनशील तथा नाजूक पद्धतीची असतील. संपूर्ण मोहिमेचा परमोच्च बिंदू म्हणजे चांद्रयानचे चंद्रावर उतरणे. ते उतरण्यास 15 मिनिटे लागतील आणि यशस्वीपणे हे यान चंद्रावर उतरल्यास चांद्रयान-3 ची ही मोहीम यशस्वी ठरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. या चांद्रयान-3 मुळे चंद्रावरील परिस्थितीची आपल्याला पूर्णत: कल्पना येणार आहे. आज सायंकाळी चंद्राच्या कक्षेत भू-पातळीपेक्षा 25 कि. मी. उंचीवरून चांद्रयान-3 भूपृष्ठावर पोहोचण्यासाठी साधारणत: 15 ते 20 मिनिटे लागणार आहेत. भूपृष्ठावर उतरल्यानंतर सहाचाकी प्रज्ञान सेव्हर विक्रम लँडरमधून रॅम्पच्याआधारे खाली उतरणार आणि इस्रोकडून संदेश गेल्यावर चंद्राच्या पृष्ठभागावर धावू लागेल. चंद्राच्या मातीवर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभ आणि इस्रोचा लोगो उमटविणार आहे. 14 जुलैपासून सुरू झालेल्या या चांद्रयान-3 ची आतापर्यंतची कामगिरी समाधानकारक आहे. अगोदर पृथ्वीच्या अंतराळ कक्षेत फिरत राहिलेल्या या यानाने 1 ऑगस्टला चंद्राकडे आपला प्रवास सुरू केला होता. चंद्राच्या पृष्ठभागावर जेव्हा हे यान पोहोचणार, त्यानंतर ते एक लुनार डे म्हणजे एक चंद्र दिवस ते थांबणार आहे. एक चंद्र दिवस म्हणजे पृथ्वीतलावरील 14 दिवसांच्या बरोबरचे आहेत. चंद्रावर रोव्हर उतरणार आणि फिरत राहील. ते तेथील छायाचित्रे गोळा करून इस्रोला पाठवील. या रोव्हरला कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्यातून चंद्राच्या पृष्ठभागावरील सविस्तर माहिती मिळेल. चंद्रावरील तापमान हे 100 ते 200 डि. सें. उणे असते. अति थंडीमुळे तिथे पाण्याचे अंश असू शकतात. अति गारव्याने यंत्रणा खराब होऊ नये याकरिता आवश्यक ते सोलर पॅनल रोव्हरवर बसविण्यात आलेले आहेत. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीनने जरी अशा पद्धतीची कामगिरी बजावलेली असली तरी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार असल्याने या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. भारताने चांद्रयान-1 2008 मध्ये सोडले होते. चांद्रयान-2 हे 4 वर्षापूर्वी सोडले होते, मात्र ते वर जाण्याअगोदर पृथ्वीवरच जळून पडले. 1969 मध्ये अमेरिकेच्या अपोलो 11 मिशनद्वारे नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर उतरले होते. चंद्रावरील परिस्थिती त्यांनी प्रत्यक्षात पाहून ते परतले होते. त्यावेळेपासून जगाला चंद्र आणि पृथ्वी याचा अभ्यास करणे तसेच ब्रह्मांडाचा एकूणच इतिहास शोधून काढणे, अभ्यास करणे याकरिता चंद्र हा खजाना ठरणार आहे. चंद्राची निर्मिती कशी झाली? याचा शोध घेणे आजपर्यंत अनेकांनी चालू केले, तरीही उत्कंठा आहेच. भारतीय धर्मशास्त्रात चंद्राला देव मानलेले आहे आणि चंद्राची प्रत्येक भारतीयांना ओळख ही त्याच्या बालपणापासूनच झालेली असते. चंद्राचे आकर्षण हे कधीही संपलेले नाही व ते संपणारही नाही. चंद्राचा पृथ्वीतलावर होणारा थेट परिणाम आपण भरती, ओहोटी तसेच सूर्यग्रहण, चंद्रग्रहणाच्या वेळीदेखील अनुभवत असतो. चंद्राची वैज्ञानिकदृष्ट्या सविस्तर माहिती चांद्रयान-3 सारख्या मोहिमेद्वारे आपल्याला मिळणार आहे. भारतीय वैज्ञानिकांनी या मोहिमेसाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे यश हे आज सायंकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी चंद्रावर प्रत्यक्षात रोव्हर उतरल्यावर दिसून येईल. गेल्याच आठवड्यात रशियाच्या लुनार मोहिमेंतर्गत अखेरच्या क्षणी यंत्रणा जळून खाक झाल्याने आतापर्यंत केलेले अथक प्रयत्न व्यर्थ ठरले होते. ‘प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट’ असे म्हटलेले आहे. चंद्राची आपण जी प्रतिमा पाहतो त्याहून आपण फार आनंदी होतो. त्यातल्यात्यात पौर्णिमेला त्याचे ते स्वरूप त्याचे शितल चांदणे, दुरून फार हवाहवासा वाटणारा तेजस्वी चांदोबा प्रत्यक्षात तो किती खडबडीत आहे, ओबडधोबड आहे याचे चित्र चांद्रयान-3 ने पाठविलेल्या चित्रांतून आतापर्यंत दिसून आले. प्रत्यक्षात रोव्हर आज सायं. 6 वा. चंद्रावर स्वारी करणार आहे. चंद्रावरील पृष्ठभूमी नेमकी कशी आहे याचे यथार्थ दर्शन पृथ्वीतलावर होणार आहे. भारतासाठीच नव्हे तर जगासाठी आजचा दिवस हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा राहिल. भारताने पाठविलेले चांद्रयान -3 प्रत्यक्ष चंद्रावर 14 दिवस वास्तव्यासाठी जात आहे. भारतीय शास्त्रज्ञांची कीर्ती त्यातून जगभरात पोहोचणार आहे. आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट पहात आहोत ती घटिका आता समिप पोहोचलेली आहे. भारत काही नाही लहान! हे कवीने काही वर्षांपूर्वी म्हटले होते, त्याचा प्रत्यय आता प्रत्यक्षात क्षणोक्षणी येत आहे.








