रत्नागिरी :
यावर्षीच्या आंबा हंगामात मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात फळांचे भाव काहीसे कमी झाले आहेत. रत्नागिरीच्या स्थानिक बाजारपेठेत चांगल्या आंब्यांचा भाव 1,200 ते 1,800 रुपये डझन एवढा द्यावा लागत आहे. पुढच्या महिन्यात तो यापेक्षा कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या 250 ते 280 ग्रॅम आकाराच्या 1 डझनला 2 हजार रुपये, 220 ते 250 ग्रॅम आकाराच्या फळासाठी 1 डझनला 1,500 रुपये, 190 ते 220 ग्रॅम आकाराच्या फळासाठी 1 डझनला 1,200 रुपये आणि 160 ते 190 ग्रॅम आकाराच्या फळासाठी 1 डझनला 1,000 रुपये असा भाव सध्या सुरु असल्याची माहिती पावस तालुका रत्नागिरी येथील आंबा उद्योजक राजेंद्र जाधव यांनी दिली.
रत्नागिरी शहरातील ठिकठिकाणच्या आंबा व्यापाऱ्यांकडे 900 रुपये डझनपासून छोट्या फळाला घेतले जात आहेत. व्यापाऱ्यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात आंबा फळाचा दर उतरेल. 15 एप्रिलनंतर सामान्य लोकांच्या आवाक्यात फळ येईल, अशी अपेक्षा आहे. सध्या परगावी राहणारे लोक स्थानिक बाजारातील आंबा खरेदी करुन तो आपल्या गावी नेत आहेत. स्थानिक लोक आंबा खरेदी करुन तो आपल्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना पाठवून देत आहेत.








