ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर 24 तासात अजित पवार आमदारांसह भाजपसोबत जाणार होते. त्यासाठी आमदारांचं पत्रही तयार करण्यात आलं होतं. त्यावर माझीही सही होती, पण जयंत पाटलांनी त्याला विरोध केला, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
आव्हाड म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या बंडांनतर 24 तासात राष्ट्रवादीकडून आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार करण्यात आलं होतं. अजित पवार यांनी सांगितलं म्हणून मी देखील त्यावर सही केली होती. अजित पवार आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार होते. पण शरद पवारांना एकटं कसं सोडायचं म्हणून जयंत पाटलांनी हे पत्र दिलं नाही. त्यावेळी जयंत पाटील रडलेही होते.
दरम्यान, शरद पवार यांचा फोटो वापरण्यावरुन ते म्हणाले, शरद पवार जिवंत आहेत ना…त्यांनी सांगितले आहे, माझे फोटो वापरू नका, मग त्यांचे फोटो अजित पवार गट कसा वापरतो? शरद पवार यांचे विचार पटत नाहीत, तर फोटो का वापरता? असा सवालही आव्हाड यांनी केला.








